- मनीषा म्हात्रेमुंबई - लग्नसोहळ्यातील आहेर चोरांनी आता थेट पंचतारांकित हॉटेलमध्ये मोर्चा वळविला असून, एका अमेरिकन वराच्या अहेरावरच हात साफ केल्याचे समोर आले आहे. साकीनाक्यातील पेनिन्सुला हॉटेलच्या लॉनमध्ये आयोजित विवाह सोहळ्यातून चोरांनी आहेर लंपास केलो. या प्रकरणी वराच्या वडिलांनी साकीनाका पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलीस तपास सुरू आहे.बोरीवलीचे रहिवासी दिलीपकुमार रामकिशोर शुक्ला (५३) हे व्यावसायिक आहेत. त्यांची त्याच भागात मसाला मिल आहे. त्यांना दोन मुले असून, मोठा मुलगा अभिषेक (३०) हा गेल्या २५ वर्षांपासून अमेरिकेत वास्तव्यास आहे. त्याचे लग्न जुळल्याने साकीनाक्यातील पेनिन्सुला हॉटेलमध्ये त्यांनी विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते. २७ जानेवारीला रात्री ८ च्या सुमारास लग्नाचे वºहाड पेनिन्सुलामध्ये दाखल झाले. २८ जानेवारीला रिसेप्शन पार पडले. जवळपास सहाशे ते सातशे उद्योगजक, व्यापाऱ्यांसह अनेक प्रतिष्ठित या वेळी हजर होती. रात्री १ वाजता रिसेप्शन संपले. त्या वेळी दुसरा मुलगा सिद्धेशने चार बँगांमध्ये आहेरात आलेल्या पैशांच्या पाकिटांसह अन्य वस्तू ठेवल्या.त्यानंतर, सगळे जेवणासाठी निघून गेले. रात्री दोनच्या सुमारास जेवण करून परतल्यावर तेथे बॅगा नसल्याचे लक्षात आले.तेथील ठेकेदाराला विचारले असता, बॅगांबाबत कॅप्टन मनोज जोशी यांना माहिती दिल्याचे त्याने सांगितले. त्यानुसार, त्यांनी जोशी यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी फक्त ३ बॅग मिळाल्याचे सांगितले. चौथ्या बॅगेबाबत काहीही माहिती नसून, याबाबत कर्मचाºयांकडे चौकशी करतो, असेही सांगितले. २९ जानेवारीला शुक्ला कुटुंबीयांनी हॉटेलमधून चेकआउट केले.तीन दिवस फोनवरून ते जोशी यांच्या संपर्कात होते. मात्र, काहीच प्रतिसाद न मिळाल्याने, अखेर १ फेब्रुवारीला त्यांनी हॉटेलमध्ये जाऊन विचारपूस केली. तेव्हा जोशी यांनी त्यांना बॅगबाबत काहीच माहिती मिळाली नाही, असे सांगितले. हॉटेलकडून नीट प्रतिसाद न मिळाल्यानेच अखेर सोमवारी पोलिसांत तक्रार केल्याचे शुक्ला यांनी सांगितले. त्यांच्या तक्रारीनुसार, हरवलेल्या बॅगेमध्ये जवळपास २ लाखांहून अधिक रोकड होती. त्याच बॅगेवर चोराने हात साफ केला. ती बॅग हॉटेल लॉनमधील स्टेजवरून चोरी झाल्याचे त्यांनी नमूद केले आहे.या प्रकरणी अनोळखी व्यक्तीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला असून, हॉटेलमधील सीसीटीव्ही तपासण्यात आले. त्यानुसार, अधिक तपास सुरू असल्याची माहिती साकीनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर सावंत यांनी सांगितले....तेथे काय झाले हे समजले नाहीरात्रीच्या सुमारास लॉनमधील स्टेजवर सामान असल्याचे संबंधित ठेकेदाराकडून समजताच, १० मिनिटांतच स्टेजकडे गेलो. तेव्हा तिथे ३ बॅगा होत्या. त्या बॅगा घेऊन रिसेप्शनकडे ठेवल्या. शुक्ला कुटुंबीय येताच, त्यांना त्या दिल्या. अशात लॉन परिसरातील सीसीटीव्ही बंद होते. त्यामुळे तेथे काय झाले, हे समजले नाही. स्टेजसह तेथील सामान हटविण्यासाठी ठेकेदारांचे शंभर ते दीडशे कर्मचारी होते. त्यामुळे बॅगा कोणी घेतल्या, हे आम्ही सांगू शकत नसल्याचे आम्ही शुक्ला यांना सांगितल्याचे पेनिन्सुला हॉटेलचे कॅप्टन मनोज जोशी यांनी सांगितले.
पंचतारांकित हॉटेलमधून अमेरिकेतील वराचा अहेर चोरीला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2019 6:33 AM