मुंबई - मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे, त्यामुळे आर्थिक गुन्हे घडण्याचेही प्रमाणही मुंबईत अधिक आहे. याच महिन्यात शहरातील लोकमान्य टिळक मार्गावरील एका सोन्याच्या दुकानात चोरट्यांनी मोठा दरोडा टाकला होता. या दरोड्यातून मोठ्या प्रमाणात सोने आणि रोख रक्कम लंपास करण्यात आली होती. मात्र, एल.टी. मार्ग पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी 15 दिवसांत या धाडसी चोरीचा तपास लावला आहे. याबाबत, स्वत: मुंबईचे पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.
मुंबईच्या LT मार्ग PS ला 14 जानेवारी रोजी भुलेश्वरमधील एका ज्वेलरी दुकानातून तेथील कर्मचारी गणेश एचके देवासी आणि इतर 4 जणांनी 8.19 कोटी रुपयांचे तब्बल 17.4 किलो सोने सोने चोरी केले होते. तसेच, 8.57 लाख रुपयांची रोकडही पळविण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले होते. त्यानंतर, पोलिसांनी या धाडसी चोरीचा तपास सुरू केल्याने पोलिसांनी 10 जणांना अटक केली आहे. या आरोपींकडून 89% मालमत्तेची वसुली करण्यात आल्याचे विश्वास नांगरे पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
पोलिसांच्या विशेष पथकाने उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये जाऊन तपास केला. येथूनच आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींनी चोरी करताना परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचा सीडीआरही चोरून नेला होता. मात्र, पोलिसांनी योग्य दिशेने तपास करत एसआयटीची 6 पथके दोन्ही राज्यात रवाना केली होती. त्यानंतर चोरट्यांना बेड्या ठोकण्यात आल्या. सोन्याचे व्यापारी टामका यांच्या दुकानात काम करणाऱ्या एका कामागारानेच या चोरीचा कट रचला आणि मित्राच्या मदतीने ही चोरी केल्याचं तपासात उघड झालं आहे. विश्वास नांगरे पाटील यांनी या तपास पथकाचे अभिनंदन केले आहे.
शेतात पुरलं सोनं
आरोपीनी हे सोने राजस्थानमधल्या सिरोहीमध्ये नेऊन शेतात 6 फूट खोल खड्ड्यात पूरून ठेवलं होतं. मात्र मुंबई पोलिसांनी केलेल्या सखोल तपासानंतर ते परत मिळवण्यात यश आलं. सुरुवातीला या चोरीच्या गुन्ह्यात फक्त 4 आरोपींचा सहभाग होता. मात्र राजस्थानच्या सिरोही गावात पोहोचल्यानंतर आपल्या मागे पोलीस लागलेत हे लक्षात येताच आरोपींनी हे सोने वेगवेगळ्या इसमांकडे ठेवायला दिलं आणि त्यांनीही या कटात सहभाग दर्शवला. पोलिसांनी चार टप्प्यात केलेल्या तपासात एकूण 10 आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे तर उर्वरित दोन आरोपी फरार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.