पिंपरी -चोरीच्या मालवाहू वाहनातून चोरीचा माल वाहून नेत असताना सराईत चोरटे पोलिसांच्या जाळ्यात अडकले. आरोपीला अटक करून त्याच्याकडून घरफोडी आणि वाहनचोरीच्या गुन्ह्यातील चार लाख ८७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.चिखली आणि नवी मुंबईमधील खांडेश्वर पोलीस ठाण्यातील दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. ही कारवाई खंडणी व दरोडाविरोधी पथकाने मोशी येथे केली. सागर आत्माराम गायकवाड (वय २३, रा. आदर्शनगर, मोशी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत यांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी व दरोडाविरोधी पथक शहरात गस्त घालत असताना सराईत चोरटा मोशी येथे थांबला असल्याची माहिती पोलीस नाईक किरण काटकर यांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून त्याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने साथीदार पवन्या बाबर, सचिन पवार, विकास ऊर्फ टिकल्या काजळकर यांच्या मदतीने देहू-आळंदी रस्त्यावर चिखली येथील एका दुकानाचे शटर उचकटून चोरी केली असल्याची कबुली दिली. त्याच्याकडून पोलिसांनी३७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
आरोपीकडे कसून चौकशी केली असता, नवी मुंबई पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक मालवाहू मोटार चोरून आणली असल्याची कबुली त्याने दिली. त्या मोटारीतून चिखली येथील घरफोडीच्या गुन्ह्यातील माल वाहून नेला जात होता. पोलिसांनी चार लाख ५० हजार रुपये किमतीचे मालवाहू वाहन जप्त केले आहे. त्याच्याकडून एकूण चार लाख ८७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे चिखली पोलीस ठाण्यातील घरफोडीचा एक आणि खांडेश्वर पोलीस ठाण्यातील वाहन चोरीचा एक गुन्हा उघडकीस आला आहे.चोरीचा माल रस्त्यावर विकणाऱ्या तिघांना खंडणी व दरोडाविरोधी पथकाने मंगळवारी अटक केली. अटक केलेल्या तिघांपैकी एकजण सराईत आहे. त्यांच्याकडून लॅपटॉप, डोंगल, मोबाइल फोन असा एकूण २८ हजार ६०० रुपये किमतीचा ऐवज जप्त केला. या कारवाईमुळे चिंचवड पोलीस ठाण्यातील घरफोडीचा गुन्हा उघड झाला आहे.खंडणी व दरोडाविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत यांनी दिलेल्या माहितीनुसार, वीरेंद्र भोलेनाथ सोनी (वय २१, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड), आसिफ जब्बार मुजावर (वय १९, रा. आकुर्डी गावठाण), सागर उत्तम तडाखे (वय २१, रा. काळभोरनगर, चिंचवड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.सोनसाखळी चोरीच्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी खंडणी व दरोडाविरोधी पथकाचे एक पथक पिंपरी-चिंचवड शहरात गस्त घालत होते. पोलीस नाईक किरण खेडेकर यांना माहिती मिळाली की, पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार वीरेंद्र सोनी हा खंडोबा माळ चौकाजवळ चोरीचे साहित्य विक्री करीत आहे. त्यानुसार पोलिसांनी खंडोबा माळ परिसरात सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता, आरोपी वीरेंद्र याच्याकडे लॅपटॉप आणि डोंगल आढळून आले. आरोपी आसिफ याच्याकडे दोन मोबाइल आणि आरोपी सागर याच्याकडे एक मोबाइल असा एकूण २८ हजार ६०० रुपयांचा ऐवज मिळून आला. पोलिसांनी सर्व ऐवज जप्त केला. आरोपी विकत असलेल्या साहित्याविषयी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सर्व ऐवज बिजलीनगर, चिंचवड येथून एक घरफोडी करून लॅपटॉप चोरला असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल आहे. आरोपींना अटक करून पुढील कारवाईसाठी चिंचवड पोलिसांकडे देण्यात आले आहे.