भिवंडी - अमेरिकेतील शिकागो तसेच कॅनडा येथे सुमारे अडीच कोटी रुपयांच्या बेडशीट मालाच्या ऑर्डरच्या बदल्यात चक्क सिमेंट ब्लॉक भरून कंपन्यांची फसवणूक करणाऱ्या चौकडीच्या नारपोली पोलोसांनी उत्तर प्रदेश येथून मुसक्याआवळत त्यांच्याकडून एक कोटी ९२ लाखांचा माल जप्त केला असल्याची माहिती नारपोली पोलीसांनी बुधवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
भिवंडी येथील एनएमके टेक्स्टाईल मिल्स व ग्लोब कॉटयार्न या दोन कंपनींना अमेरिकेतील शिकागो व कॅनडा येथील कंपनीने कॉटन बेडशीट बनवून देण्याची ऑर्डर दिली असता कंपनींनी अनुक्रमे १ कोटी २६ लाख ९९ हजार ८०९ व १ कोटी १५ लाख असा एकूण २ कोटी ४१ लाख ९९ हजार ८०९ रुपयांचे तयार बेडशीट सी बर्ड एजन्सी मार्फत ओमसाई लॉजेस्टिक यांच्या कंटेनर मधून न्हावा शेवा बंदरातून अमेरिकेस ऑक्टोबर व नोव्हेंबर २०२० रोजी पाठविले असता अमेरिकेत सदर कंटेनर मध्ये बेडशीट च्या ऐवजी चक्क सिमेंट ब्लॉक चे वजनी बॉक्स मिळाल्याने एकच खळबळ उडाली. यासंदर्भातील माहिती संबंधित कंपनीने भिवंडीतील कंपनी चालकांना दिली असता या फसवणुकी प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात मालाच्या अपहार झाल्या बाबत तक्रार देऊन गुन्हा दाखल केला होता .
या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत ढोले यांच्या नेतृत्वाखाली दोन स्वतंत्र पथके करीत असताना नारपोली पोलीस ठाण्यातील पोलीस उप निरीक्षक पुष्पराज सुर्वे व त्यांचे सहकारी पोलीस हवा बोडके , पो ना गावडे ,सहारे, शिंदे,पो शि सोनवणे ,बाविस्कर ,जाधव, विजय ताठे यांनी यांनी कंटेनरचे जीपीएस ,कंटेनर चालकांचे मोबाईल सिडीआर या तांत्रिक बाबींचा तपास करून उत्तर प्रदेश येथ तब्बल १९ दिवस पाळत ठेवून चार आरोपींना ताब्यात घेत त्यांच्याकडे कसून चौकशी करीत उत्तर प्रदेश व वसई येथे लपवून ठेवलेला सुमारे १ कोटी ९२ लाख ८७० रुपयांचे बेडशीट जप्त करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे . या गुन्ह्यातील आरोपींनी मालाच अपहार करण्यासाठी कंटेनर वसई येथे नेऊन त्यातील बेडशीट काढून तेवढ्या वजनाचे सिमेंट ब्लॉक कार्टून मध्ये भरून तो माल अमेरिकेस पाठविल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती पत्रकार परिषदेत पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी दिली आहे .