मुंबई - गोरेगाव येथील वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरून बेदरकारपणे बाईक रेसिंग करणाऱ्या ४० ते ५० जणांच्या टोळक्याने नाकाबंदीसाठी असलेल्या पोलिसांवर दगडफेक केल्याची धक्कादायक घटना घडली.आज पहाटे ४ वाजताच्या सुमारास हि घटना घडली आहे. याबाबत दिंडोशी पोलीस ठाण्यात रॅश ड्राइविंग आणि दंगल भडकविणे असा गुन्हा दाखल करून ७ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर उर्वरित बाईक रेसर अल्पवयीन असल्याने त्यांच्या पालकांना नोटीस देण्यात आली असल्याची माहिती तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक शिंदे यांनी लोकमतशी बोलताना दिली.
आज पहाटे ४ वाजताच्या सुमारास गस्तीवर असलेल्या पोलिसांना काही मोटारसायकलस्वार रेसिंग करत येत असल्याची माहिती वायरलेस फोनवरून मिळाली. त्यानुसार गस्तीवर असलेल्या पोलिसांची गाडी ऑबेरॉय मॉलच्या नाक्यावर नाकाबंदी आली. त्यानंतर वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरून रेसिंग करत भरधाव वेगाने येणाऱ्या ४० ते ५० बाईकस्वारांना पोलिसांनी अडविले. तरीदेखील बाईकस्वार वेडीवाकडी मोटारसायकल चालवत होते. पोलिसांनी बाईकस्वारांना थांबविल्यानंतर त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. मात्र, सुदैवाने दगडफेकीमुळे पोलीस जखमी झाले नाही. दगड पोलिसांच्या गाडीवर फेकले गेले असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक शिंदे यांनी दिली. ४० ते ५० बाईकस्वारांपैकी ७ जणांना अटक केली असून त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. ७ आरोपींपैकी ३ अल्पवयीन आरोपी आहेत. त्याचप्रमाणे काही अल्पवयीन बाईकस्वारांच्या पालकांना नोटीस पाठवून पोलीस बोलावतील त्यावेळी पोलीस ठाण्यात हजर करण्यास सांगितले आहे.