औरंगाबाद : कर्ज फेडण्यासाठी एका तरुणाने चक्क घरात घुसून तरुणाच्या डोक्याला गावठी कट्टा रोखून लुटण्याचा प्रयत्न केला. घरातील मंडळींनी प्रसंगावधान राखून त्याला पकडले. यावेळी झालेल्या झटापटीत कट्टा खाली पडल्याने आरोपीने पेपर स्प्रे मारून त्यांना झटका देत पळ काढला. मात्र, गल्लीतील तरुणांनी पाठलाग करून त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. ही थरारक घटना मयूरपार्कमधील हरसिद्धी सोसायटीत मंगळवारी दुपारी घडली.
राहुल रावसाहेब आधाने (वय २९, रा. रांजणगाव शेणपुंजी, वाळूज) असे आरोपीचे नाव आहे. हरसिद्धी हाऊसिंग सोसायटीतील रहिवासी संजय गाढे हे वाळूज औद्योगिक परिसरातील इंड्युरंस कंपनीमध्ये सरव्यवस्थापक आहेत. गाढे कुटुंब राहुलला ओळखत नाही. मात्र, राहुलला गाढे परिवाराच्या कुटुंबाला संपूर्णपणे ओळखत होता. गाढे यांचा बंगला असल्याचे माहित होते. आरोपी रांजणगाव येथील दूध डेअरीवर कामाला आहे. लॉकडाऊन कालावधीत त्याच्यावर कर्ज झाले. पैशासाठी अनेक जण त्याच्याकडे तगादा लावत असल्याने कर्ज फेडण्यासाठी त्याने गाढे परिवाराला लुटण्याचे प्लॅन रचला.
दुपारी अडीच वाजेच्या सुमारास त्याने गाढे यांचे दार ठोठावले असता गाढे यांचा मोठा मुलगा सौरभने दरवाजा उघडला. यावेळी आरोपीने मला प्रशांत जोशी यांनी पाठवले आहे; साहेब आहेत का, असे विचारले. वडील झोपले असल्याचे सौरभ त्याला सांगत असताना आरोपी घरात घुसला आणि त्याने गावठी पिस्टल काढून सौरभच्या कपाळावर रोखले. यानंतर आरोपीने एक लाख रुपये द्या, अशी मागणी केली. याचवेळी स्वयंपाक खोलीतून सौरभची आई बाहेर आली. त्यांनी प्रसंगावधान राखून त्याला कशासाठी पैसे पाहिजे, असे विचारले. सौरभने त्याच्याजवळ ५ ते १० हजार रुपयेच असल्याचे सांगितले. तेव्हा आरोपीने ५७ हजारांची गरज असल्याचे सांगितले. पैसे दिले नाही तर गावठी कट्टा देणारे मला मारतील, असे तो म्हणाला आणि पिस्टल खाली केले. तो शांत झाल्याचे पाहून वरच्या खोलीत झोपलेल्या साहेबांकडून पैसे घेऊन देतो, असे म्हणून सौरभ त्याला वरच्या मजल्यावर घेऊन गेला. तोपर्यंत त्याच्या आईने आधीच संजय यांना हा प्रकार सांगितला. हा सर्व प्रकार चालू असताना शेजारच्या खोलीतून सौरभचा लहान भाऊ तेथे आला. एकाच वेळी चौघांना पाहून राहुलने सौरभच्या लहान भावावर पिस्टल रोखून पुन्हा पैसे मागितले. यावेळी सौरभसह तिघांनी त्याच्यावर झडप घालताच आरोपीच्या हातातील पिस्टल पडले.
पेपर स्प्रे मारून ठोकली धूम : घरातील सदस्यांचा रुद्रावतार पाहून त्याने खिशातील पेपर स्प्रे गाढे कुटुंबावर मारला. यावेळी झटापटीत त्याने घरातून धूम ठोकली. मात्र, त्याच्या मागे आरडाओरड करीत पळालेल्या गाढे परिवाराला पाहून गल्लीतील तरुणांनी त्याला पकडले.
गावठी कट्टा, चाकू, पेपर स्प्रे जप्त तरुणांनी त्याला चोप देत घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोनि. सचिन इंगोले, सपोनि. नितीन कामे आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन आरोपीला ताब्यात घेतले. पिस्टल, चाकू आणि पेपर स्प्रे जप्त केला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.