यवतमाळ : लग्नानंतर वर्षभऱ्यातच महिलेला सासरच्या मंडळींनी माहेरहून १५ लाख रुपये आण असा तगादा लावला. हा छळ असह्य झाल्याने त्या महिलेने चिमुकल्या मुलीला घेऊन आपले माहेर गाठले. मात्र पत्नीच्या दस्ताऐवजाचा दुरुपयोग करत बँकेतून तिच्या नावे बारा लाखाचे वाहन कर्ज काढले. हा प्रकार बँकेची नोटीस आल्यानंतरच सदर महिलेला माहीत झाला. तिने दिलेल्या तक्रारीवरून सासरच्या सहा जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
साैरभ गजानन डुचाळे (३२) रा. बाजोरियानगर, मनीषा गजानन डुचाळे (५५), श्रद्धा पंकज ठाकरे (३५) रा. कोथरूड पुणे, स्वप्नील इंजाळकर रा. आर्णी रोड यवतमाळ, संतोष रामभाऊ लोणारे (३२) रा. सारस्वत अर्बन मल्टीसिटी निधी लिमिटेड, गजानन रामकृष्ण डुचाळे रा. बाजोरियानगर असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहे. साैरभ हा त्याच्या पत्नीला माहेरावरून १५ लाख रुपये आणण्यासाठी तगादा लावत होता. दोन वर्षाच्या संसारानंतर पत्नीला घराबाहेर काढून दिले. तो तिला घटस्फोटाची मागणी करू लागला. यासंदर्भात अवधूतवाडी पोलीस ठाण्यात सदर महिलेने २९ ऑक्टोबर २०१९ रोजी तक्रार दिली होती. त्यानंतर ती माहेरी वडिलांकडेच राहू लागली.
१६ मे २०२१ रोजी या महिलेला सारस्वत अर्बन मल्टीसिटी निधी लिमिटेड या पतसंथेतून नोटीस आली. १२ लाख रुपये वाहन कर्ज उचलले असून त्याची परतफेड केली जावी असे त्यात नमूद होते. कुठलेही वाहन घेतले नसताना कर्ज कसे काय असा धक्का त्या महिलेला बसला. तिने वडिलाना घेवून संबंधित पतसंस्थेचे कार्यालय गाठले. या ठिकाणी महिलेच्या नावाने बचत खाते क्रमांक काढण्यात आला होता. मात्र बँकेने त्या खात्याचे स्टेटमेंट दिले नाही. महिलेचा पती साैरभ डुचाळे, सासू-सासरे यांनी संगनमत करून संतोष रामभाऊ लोणारे यांच्या मदतीने खोटे कागदपत्रे तयार करून परस्पर १२ लाख रुपयांचे वाहनकर्ज उचलले. खोटे कागदपत्र तयार करून फसवणूक केल्याची तक्रार अवधूतवाडी पोलिसांनी सहा जणांविरुद्ध दाखल केली आहे. याचा अधिक तपास अवधूतवाडी ठाणेदार मनोज केदारे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.