भरतपूर – राजस्थानच्या भरतपूर येथे एका सनकी पतीनं पत्नीला व्हिडीओ कॉल करत स्वत:च्या गाडीलाच आग लावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पतीच्या या कृत्यामुळे आसपासच्या गाड्याही आगीच्या कचाट्यात येण्यापासून थोडक्यात वाचल्या. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक लोकं जमा झाली. त्यांनी तातडीनं पेटत्या कारच्या बाजूच्या सर्व गाड्या त्याठिकाणाहून हटवल्या. तेवढ्यात पेटती कार मालकानं त्याच अवस्थेत दूर नेली त्यामुळे मोठी हानी टळली.
पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी पतीला अटक केली. त्यानंतर त्याची पत्नी वडिलांसह पोलीस स्टेशनला आली. पत्नी म्हणाली, पतीच्या अशा वागण्याला कंटाळली आहे. परंतु काहीच करु शकत नाही. भरतपूरच्या सूरजमल भागात राहणाऱ्या कांता प्रसाद यांनी सांगितले की, माझी मुलगी प्रीतीचं २००३ मध्ये नदिया परिसरात राहणाऱ्या प्रविणसोबत लग्न केले होते. लग्नानंतर प्रविण-प्रिती यांच्या भांडणं होऊ लागली. वारंवार प्रविण प्रितीशी वाद घालत होता. या दोघांना २ मुली आहेत. रागाच्या भरात कधी प्रविण स्वत:ला नुकसान पोहचवायचा तर कधी प्रितीला त्याचा त्रास सहन करावा लागायचा. घरातील अनेक सामानाची तोडफोड करत प्रितीला टॉर्चर केले जायचे असं त्यांनी सांगितले.
पत्नीला दाखवला Live व्हिडिओ
एक दिवसाआधी प्रिती तिच्या वडिलांकडे आली होती. त्यामुळे नाराज झालेल्या प्रविणला अचानक काय झाले आणि तो दारु पिऊन घरी परतला अन् हा कांड केला. प्रविणनं बाटलीत पेट्रॉल आणलं होतं. त्याने कार सुजान गंगा नदीजवळ उभी केली होती. नशेच्या अवस्थेत प्रविणनं त्याच्या पत्नीला व्हिडीओ कॉल केला. व्हिडिओ कॉल केल्यानंतर प्रविणनं सुरुवातीला गाडीवर पेट्रॉल टाकलं आणि ५ मिनिटांत आग लावली. हे सर्व दृश्य पत्नी लाईव्ह कॅमेऱ्यात पाहत होती.
त्यानंतर प्रितीनं तिच्या वडिलांना फोन केला आणि सगळा प्रकार सांगितला. सासरे कांता प्रसाद यांनी प्रविणला रोखण्याचा प्रयत्न केला परंतु त्याने कुणाचंही ऐकलं नाही. प्रविणनं कारला आग लावली तेव्हा जवळ उभ्या असणाऱ्या कारही आगीच्या लपेट्यात सापडल्या. दुसरीकडे आग पाहून लोकांची गर्दी जमली. त्यानंतर पाण्यानं आग विझवण्याचा प्रयत्न सुरु झाला. स्थानिक लोकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी येईपर्यंत आग विझली होती. त्यानंतर पोलिसांनी आरोपी प्रविणला ताब्यात घेतलं.