नालासोपारा - वसई विरार महानगरपालिकेच्या हद्दीत ज्या प्रकारे अनधिकृत बांधकामे सुरू आहेत त्याचप्रमाणे वीज चोरी करणाऱ्यांची संख्याही तेजीने वाढत आहे. वीज चोरी करणाऱ्यांवर अंकुश लावण्यासाठी महावितरणने जोरदार कारवाई सुरू केली असून त्यांच्यावर स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याचे सुरू आहे. नालासोपाऱ्याच्या पूर्वेकडील संतोष भवन परिसरात वीज चोरी करणाऱ्या 10 जणांविरोधात महावितरणने तक्रारी दिल्यानंतर तुळींज पोलिसांनी मंगळवारी तीन गुन्हे दाखल केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार पूर्वेकडील संतोष भवन येथील विजय सिंह चाळीतील सदनिका नंबर 2, 3, 5, 6, 7 आणि 16 यामध्ये मागील सहा महिन्यांपासून चोरीची वीज वापरली जात होती. महावितरणने तक्रार दिल्यानंतर बांधकाम व्यवसायिक संजय सिंह याच्यासोबत सदनिकेमध्ये राहणारे सोनिया विश्वकर्मा, राजू माईवलाल वर्मा, राम विलास विश्वकर्मा, अया अब्दुल खान, मोहम्मद शकिर खान, मोहम्मद शकरीर खान आणि राजू चंद्रकांत उदिर यांनी गेल्या 6 महिन्यापासून 31 हजार 80 रुपयांची 2021 युनिटची वीज चोरी केली म्हणून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर दुसऱ्या घटनेत संतोष भवन परिसरातील गरेल पाडा येथील दुर्गावती चाळीतील दुकान नंबर 1 आणि 2 मध्ये आम्रपाली लल्लनप्रसाद राजभर यांनी 9 हजार 220 रुपयांची 605 युनिटची वीज चोरी केली आहे. तर याच परिसरातील चाळीमध्ये असलेल्या सदनिका नंबर 4, 5 आणि 6 मध्ये संदीप प्यारेलाल राजभर यांनी मागील 6 महिन्यापासून 19 हजार 890 रुपयांची 1080 युनिटची वीज चोरी केली आहे. या तिन्ही तक्रारी महावितरणचे ज्युनियर इंजिनिअर झिशान अहमद जमाल यांनी तुळींज पोलीस ठाण्यात केलेल्या आहेत.