आग्रा: आग्रा पोलिसांनी दोन अशा अट्टल चोरट्यांना बेड्या ठोकल्या आहेत, जे चालत्या ट्रेनमधून लोकांचे साहित्य लंपास करत होते. पोलिसांनी या लुटारूंकडून मोबाईल, लॅपटॉपसह अन्य किंमती सामान जप्त केले आहे. देहातचे एसपी सत्यजीत गुप्ता यांनी सांगितले की, अजय हा अट्टल चोरटा आहे. त्याने लग्नासाठी मुलगी पहायला गेलेल्या घरीदेखील चोरी केली होती. (thief Ajay stole mobile from girl's house)
अजय हा स्वत:च्या लग्नासाठी मुलगी पहायला गेला होता. तेव्हा त्याने संधी साधून मुलीच्या घरातीलच मोबाईल चोरला होता. यामुळे त्याचे ठरलेले लग्न मोडले होते. बरहन पोलीस ठाणे हद्दीत अजय उर्फ अजगर राहतो. अनेकदा त्याने चोरीच्या प्रकरणांत तुरुंगाची हवाही खाल्ली आहे. अजय अविवाहित आहे. गुप्ता यांनी त्याच्या मुलगी बघण्याच्या कार्यक्रमातील किस्सा सांगितला आहे.
अजय आणि त्याचे कुटुंबीय मुलगी पाहण्यासाठी मुलीच्या घरी गेले होते. तिच्या घरी अजयला एक मोबाईल आवडला. त्याने त्या मोबाईलवरच डल्ला मारला. अजय गेल्यावर घरात कुठेच मोबाईल सापडत नसल्याचे दिसले. म्हणून चौकशी केली असता अजयने मोबाईल चोरल्याचे समजले. त्या मुलीने ठरलेले लग्न मोडले. आता अजयची नातेवाईकांत एवढी बदनामी झालीय की त्याचे लग्नच होत नाहीय.
अजय आणि त्याचा साथीदार शिलेंद्र दोघे ट्रेनमध्ये चोरी करतात. प्रवाशांचे मोबाईल, लॅपटॉप चोरतात. पोलिसांनी दोघांना पकडले आणि न्यायालयात हजर केले. तेथूनही अजयने पलायन केले आहे. दिवानी न्यायालयातून अजय फरार झाल्याचे समजताच कोर्टाचे सारे दरवाजे बंद करण्यात आले. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस त्यांना बाहेर घेऊन येत असतानाच अजय पसार झाला. सगळीकडे शोध घेतला मात्र अजय सापडला नाही.