नवी मुंबई - वर्ग मित्रांसोबत मस्ती करत असल्याच्या किरकोळ कारणावरून एका १० वर्षीय विद्यार्थ्याला शिक्षिकेने जबर मारहाण केल्याची घटना नवी मुंबईत खांदेश्वर येथे घडली आहे. नवी मुंबईतील एका खासगी शाळेतील ही घटना आहे. या मारहाणीत विद्यार्थ्याच्या कानाला सूज आली आहे. विद्यार्थ्याच्या पालकांनी याबाबत खांदेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून शाळा प्रशासनाकडून घडलेल्या प्रकाराबाबत चौकशी सुरू आहे.
खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश मोरे यांच्या म्हणण्यानुसार, विद्यार्थी हा शाळेत शिट्टी वाजवत असल्यामुळे मारहाण केल्याचं शिक्षिकेच म्हणणं आहे. विद्यार्थ्याशी क्रूरतेने वागण्याच्या कायदाचे उल्लंघन केल्यामुळे शिक्षिकेवर मुलांचे संगोपन व संरक्षण कायदा, कलम २३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याबाबत अद्याप शिक्षिकेला अटक केली नसून आम्ही दोन दिवसांत आरोपपत्र दाखल करणार असल्याची माहिती मोरे यांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळंबोतील सेक्टर - ७ मध्ये एका खासगी शाळेतील २५ वर्षीय शिक्षिकेने पाचवीतील विद्यार्थ्याला जबर मारहाण केली आहे. पीडित विद्यार्थी हा वर्गातील मित्रांसोबत मस्ती करत असल्याच्या कारणावरून शिक्षिकेने त्याच्या डाव्या बाजूच्या कानशिलात लगावली. त्यामुळे त्याच्या डाव्या कानाला सूज आली. घरी परतल्यावर शाळेतील सर्व प्रकार त्याने त्याच्या वडिलांना सांगितला. त्यावर विद्यार्थ्याला एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्याच्या वडिलांनी रायगड जिल्ह्यातील बाल संरक्षण अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर शिक्षिकेने घडलेल्या प्रकाराबाबत विद्यार्थ्याच्या घरी जाऊन माफी मागत तक्रार मागे घेण्याची विनंती केली. तक्रार मागे घेतली नाही तर तिची नोकरी जाण्याची शक्यता असल्याची विनवणी देखील शिक्षिकेने केली. त्यावर पीडित विद्यार्थ्याच्या वडिलांनी पनवेल कोर्टात तक्रार मागे घेतली.