बरेलीच्या सीबीगंजमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. क्लासवरून घरी परतणाऱ्या विद्यार्थीनीची दोन तरुणांनी छेड काढली. यास विरोध केल्याने या विद्यार्थीनीला वेगवान ट्रेनच्या समोर फेकण्यात आले. यामध्ये तिचा एक हात आणि दोन पाय कापले गेले आहेत. तसेच काही हाडांनाही फ्रॅक्चर आले आहेत. पीडिता गंभीर अवस्थेत असून तिच्यावर उपचार सुरु झाले आहेत.
या प्रकरणी मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांनी लक्ष घातले असून अधिकऱ्यांना कारवाईचे निर्देश दिले आहेत. बुधवारी सकाळी आयुक्त सौम्या अग्रवाल, आयजी राजेश कुमार सिंह, डीएम रवींद्र कुमार आणि एसएसपी घुले सुशील चंद्रभान यांनी रुग्णालयात जाऊन कुटुंबीय आणि डॉक्टरांशी चर्चा केली. याप्रकरणी एसएसपींनी पोलीस ठाण्याच्या निरीक्षकासह तीन पोलिसांना निलंबित केले आहे.
पोलिसांनी आरोपी तरुण आणि त्याच्या वडिलांना अटक केली आहे. त्याचबरोबर पीडितेच्या कुटुंबाला सरकारने 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. ही विद्यार्थीनी क्लासला ये-जा करत असताना आरोपी तरुण आणि त्याच्या साथीदार तिची नेहमी छेड काढत होते. पीडितेच्या कुटुंबीयांनी आरोपीच्या कुटुंबीयांकडे तक्रार केली होती. परंतू, तरीही ते सुधरले नाहीत, असे पीडितेच्या वकील काकांनी सांगितले.
मंगळवारी देखील ती नेहमीप्रमाणे क्लासला गेली होती. परंतू, सायंकाळी ती खड़ौआ रेल्वे क्रॉसिंगजवळ रक्तबंबाळ अवस्थेत सापडली. तिचे दोन्ही पाय कापले गेले होते. दोन तरुणांनी तिला रस्त्यात गाठून तिची छेड काढली आणि विरोध केल्याने तिला रेल्वेपुढे ढकलले, असे त्यांनी सांगितले.