ठाणे : अभ्यासाची वही न आणल्यामुळे दुसरीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या डोक्यात शिक्षिकेने स्टीलची पट्टी मारल्याची धक्कादायक घटना येथील एका नामांकित शाळेत घडली. विद्यार्थ्याला मानसिक त्रास देणाऱ्या पंकजा राजे या शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी दिली. अन्य पाच पालकांनीही या शिक्षिकेविरुद्ध मुलांना त्रास दिल्याची तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दुसरीत शिकणाऱ्या संबंधित विद्यार्थ्याने वह न आणल्यामुळे १९ जुलै रोजी पंकजा राजे यांनी त्याच्या डोक्यावर स्टीलची पट्टी मारली. त्यामुळे विद्यार्थ्याच्या डोक्याला जखम झाली. तसेच त्याला दिवसभर वर्गात एका बाजूला बसवून ठेवत मानसिक त्रास दिला. या प्रकारामुळे भेदरलेल्या मुलाने शाळेत जाण्यास नकार दिला. त्यानंतर पालकांनी विचारणा केली असता त्याने सर्व माहिती दिली. विद्यार्थ्याच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली. शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय महाजन यांनी दिली.
बडतर्फीचा अहवाल पाठविणारशिक्षिकेला शाळेतून काढून टाकण्यासाठी आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याचे लेखी निवेदन मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी शाळेच्या विश्वस्तांना दिले. त्यानंतर विश्वस्तांनीही संबंधित शिक्षिकेला कोणत्याही वर्गावर पाठविण्यात येणार नाही. तसेच त्यांच्यावरील बडतर्फीच्या कारवाईसाठी शिक्षणाधिकारी, मनपा ठाणे यांच्याकडे अहवाल पाठवणार असल्याचे लेखी आश्वासन दिले.