सफाळे : पालघर तालुक्यातील सफाळे पूर्व भागात नवघर रस्त्यावरील करवाले धरणावर रविवारी दुपारी तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. धरणावर मित्रांसमवेत पोहण्यासाठी गेलेल्या प्रवीण प्रभाकर पाटील (वय २५, रा. नवघर) याने ५० ते ६० फुटांवरून स्टंटबाजी करीत उडी मारल्याने पाण्याचा जोरदार फटका बसून बुडून मृत्यू झाला. दरम्यान, सोमवारी सकाळी १५ तासांनंतर त्याचा मृतदेह काढण्यात यश आले. याबाबत सफाळे पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रविवारी सुटीचा दिवस असल्याने पोहण्यासाठी नवघर येथील सहा तरुण करवाळे धरणात दुपारी गेले होते. त्यातील प्रवीण प्रभाकर पाटील (वय २५) याने ५० ते ६० फूट उंच असणाऱ्या पाण्याच्या टाकीवर चढून स्टंट करण्याच्या नादात पाण्यात उडी मारली. उंचावरून उडी मारताना प्रवीणच्या छातीवर पाण्याचा जबरदस्त फटका बसून क्षणार्धात ६० फुटांहून अधिक खोल असणाऱ्या धरणात बुडाला. तो पुन्हा वर आलाच नाही. मित्रांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र तो धरणाच्या तळाशी गेला.
यासंदर्भात सफाळे पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी संदीप कहाळे यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांच्या मदतीने तरुणाचा शोध घेण्यास सुरुवात केली. धरणातील पाण्याची खोली जास्त असल्याने रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम करूनही प्रवीणचा पत्ता लागला नाही. अखेर वसई तालुक्यातील उसगाव येथील पट्टीचे पोहणारे काही डुबे यांना मदतीसाठी बोलावण्यात आले. त्यांनी पहाटेपासून पुन्हा शोध मोहीम सुरू केली. यात खोल तळाशी गेलेल्या प्रवीणचा सोमवारी सकाळी साडेसात वाजता मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. सफाळे प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठविण्यात आला. तरुणांनी अशा प्रकारचे स्टंट करून जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.