- सूर्यकांत वाघमारेलोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : वरिष्ठांकडून गैरउद्देशाने छळ होत असल्याचा आरोप करत पोलीस उपनिरीक्षक बेपत्ता झाल्याची घटना कळंबोली पोलीस ठाण्यात घडली आहे. दरम्यान, वर्षभरापूर्वी एक हवालदारदेखील अशाच प्रकारे बेपत्ता झाल्याची घटना याच ठिकाणी घडली होती. उपनिरीक्षकाने मुख्यमंत्री तसेच पोलीस महासंचालक यांच्याकडे टाकलेल्या लेटरबॉम्बमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्यामुळे नवी मुंबईत बदल्यांमागे अर्थकारण होत असल्याची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे.
कळंबोली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले उपनिरीक्षक मनेष बच्छाव शनिवारी दुपारपासून बेपत्ता झाले आहेत. बेपत्ता होण्यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पोलीस महासंचालक यांना पाठवलेले पत्र व्हायरल झाले आहे. या लेटरबॉम्बमध्ये त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्याकडून छळ होत असल्याचा आरोप केला आहे. हा छळ टार्गेटपूर्तीच्या उद्देशाने होत असल्याचाही उल्लेख त्यांनी या पत्रात केला आहे. त्यामुळे नवी मुंबई पोलीस दलात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. वर्षभरापूर्वी याच पोलीस ठाण्यातील एका हवालदारानेदेखील अशाच प्रकारे वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून अज्ञातवास गाठला होता.
बदल्यांमागे अर्थकारणनवी मुंबई पोलीस आयुक्तालयात बदल्यांमागे मोठे अर्थकारण होत असल्याच्या चर्चा यापूर्वीही रंगल्या होत्या. त्यातूनच अवैध धंद्यांना थारा मिळत असल्याचेही बोलले जात होते. अशातच उपनिरीक्षकानेच वरिष्ठांवर भ्रष्टाचाराचा आरोप केल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. दरम्यान, लेटरबॉम्ब टाकून बेपत्ता झालेल्या उपनिरीक्षक मनेष बच्छाव यांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. यासंदर्भात पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह व उपायुक्त शिवराज पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.