मुंबई - पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर सेवानिवृत्त होत असल्यामुळे त्यांच्या जागी मुंबई पोलीस आयुक्त सुबोध जयस्वाल यांची वर्णी लागली आहे. त्यामुळे रिक्त होणाऱ्या मुंबई पोलीस आयुक्त पदी संजय बर्वे यांची नियुक्ती झाली.
देशात तणावाचे वातावरण असताना महासंचालक व मुंबई पोलीस आयुक्त पदासारखी महत्त्वाची पदे रिक्त ठेवणे सुरक्षेच्या दृष्टीने योग्य नसल्यामुळे शुक्रवारी तात्काळ ही पदे भरण्यात येणार आहेत. सुबोध कुमार जैस्वाल हे 1985 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. मात्र, भाजप नेत्यांशी जवळीक या जमेच्या बाजू ठरली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख संजय बर्वे हे 1987 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. राज्यगुप्त वार्ता विभागाचे प्रमुख पद त्यांनी भूषवले होते. बर्वेचे नाव मुंबई पोलीस आयुक्तपदासाठी जवळपास निश्चीत असल्याचे सूत्रांनी सांगितले. मराठी अधिकारी म्हणून भाजपचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेचाही बर्वेंना पाठिंबा असल्यामुळे त्यांचे नाव आयुक्त पदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचे गृहमंत्रालयातील सूत्रांनी सांगितले. बर्वे याचवर्षी निवृत्त होत असल्यामुळे त्यांच्यासाठी ही शेवटी संधी आहे. त्यांच्या पाठोपाठ परमबीर सिंग हे मुंबई पोलीस आयुक्त पदाच्या शर्यतीत आहेत.१९८७ बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले सिंग यांनी ठाणे पोलीस आयुक्त पदाची धुरा समर्थपणे सांभाळली होती. याबाबत आज गृहविभाग आदेश जारी करण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहिती बुधवारी रात्रीपर्यंत बर्वे यांनी सिंग यांना या स्पर्धेत मागे टाकले होते.