जोधपूर-
राजस्थानच्या जोधपूरमध्ये एका छोट्याशा निष्काळजीपणामुळे भयानक घटना घडली आणि लग्न सोहळ्यावर पाणी फेरलं गेलं. वराच्या आई-वडिलांसह काही नातेवाईकांचा सिलिंडर स्फोटात मृत्यू झाला आहे. तर अजूनही काही जण मृत्यूशी झुंज देत आहेत. या घटनेनंतर दररोज कुणीतरी प्राण सोडतंय.
सहा दिवसांपूर्वी शेरगढ परिसरात भूंगरा गावात लग्न समारंभात जेवणाची व्यवस्था सुरू असताना झालेल्या सिलिंडर स्फोटानं संपूर्ण गाव हादरलं आहे. नवरदेवानं या घटनेत आपल्या आई-वडिलांसह काही नातेवाईकांना गमावलं आहे. तर आगीमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांचे मृतदेह इतके भाजले आहेत की मुलाला आपल्या आई-वडिलांचं अंत्यदर्शन देखील घेता आलं नाही. तसंच मुखाग्नी देखील देता आला नाही.
आतापर्यंत २८ जणांचा मृत्यूया घटनेत नवरदेव सुरेंद्र सिंह यांचे आई-वडील यांच्यासह त्यांची बहिण, पुतणा, भाचा आणि भाचीसह एकूण २८ जणांचा मृत्यू झाला आहे. सुरेंद्र सिंह यांच्या कुटुंबाची सध्या अशी परिस्थिती झाली आहे की अंत्यसंस्कारावेळी त्याचा फक्त एक भाऊ उपस्थित होता. तर इतर सर्व नातेवाईक सध्या रुग्णालयात दाखल आहेत तर काही रुग्णांच्या सेवेत व्यग्र आहेत.
रुग्णालयातून नुसता फोन जरी आला तरी सुरेंद्र सिंहच्या काळजात धस्स होतं. जोधपूर ग्रामीचे एसपी अनिल कयाल यांनी सांगितलं की या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये ९ लहान मुलं, ८ महिला आणि काही पुरूषांचा समावेश आहे.
५ जणांची प्रकृती गंभीरमहत्मा गांधी रुग्णालयात दाखल असलेल्या या घटनेतील एकूण जखमींपैकी ५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे आणि ३४ जणांवर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार बुधावारी नवरदेवाची आई धापू कंवर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर लोकेंद्र सिंह, किरण कंवर, जस्समू कंवर, जमुना कंवर आणि गवरी देवी यांनीही प्राण सोडले आहेत.
कुटुंबातील दररोज कुणी ना कुणी मृत्यूला गाठत असल्यानं नातेवाईकांमध्ये दु:खाचं सावट पसरलं आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी दिल्लीला रवाना होण्याआधी महत्मा गांधी रुग्णालयात भेट देऊन याघटनेतील जखमींची आणि सुरेंद्र सिंह यांची विचारपूस केली. रुग्णालयाच्या डॉक्टर राजश्री बेहरा यांनी सांगितलं की प्लास्टिक सर्जन रजनीश गलवा यांच्या नेतृत्वात सातत्यानं डॉक्टरांची एक टीम रुग्णांवर उपचार करत आहे. तसंच जोधपूर अॅम्ब्युलन्स चालक असोसिएशनचे अध्यक्ष मुकेश यांनी सांगितलं की या घटनेत युनियनकडून सर्व मृतदेह कोणत्याही शुल्काविना त्यांच्या गावी पोहोचवण्याची व्यवस्था केली आहे.