मनोज गडनीस, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : तुझ्या कामासाठी मी ७० हजार रुपये मागितले, पण ते तू दिले नाहीस. म्हणून तुला नोटीस आली आहे. जर मला ७० हजार रुपये दिले नाहीस, तर अशाच नोटिसा वारंवार येतील आणि तुला काम पण करू दिले जाणार नाही, अशा भाषेत भारतीय रेल्वेची उपकंपनी असलेल्या इरकॉन कंपनीच्या सह-सरव्यवस्थापकाने एका कंत्राटदाराकडे लाच मागितली. या रेल्वे अधिकाऱ्याविरोधात सीबीआयने मुंबईत गुन्हा दाखल केला आहे.
पालघर जिल्ह्यातील वाणगाव येथे ही लाचखोरीची घटना घडली आहे. सीबीआयकडून प्राप्त माहितीनुसार, पालघर जिल्ह्यातील वाणगाव येथे एक डेपो इमारत तसेच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी वसाहत बांधण्याचे कंत्राट इरकॉन कंपनीने जुलै २०२२ मध्ये एका खासगी कंत्राटदाराला दिले होते. या कामाची पाहणी करण्यासाठी इरकॉन कंपनीचा सह-सरव्यवस्थापक असलेला नितीन बोकाडे हा अधिकारी तेथे जात असे. दरम्यानच्या काळात नितीन बोकाडे याने कंत्राटदाराकडे ७० हजार रुपयांची मागणी केली. मात्र, कंत्राटदाराने त्या मागणीकडे दुर्लक्ष केले.
यानंतर २० मार्च २०२३ रोजी अचानक कंत्राटदाराने केलेल्या कामांमध्ये चुका असून त्यासंदर्भात इरकॉन कंपनीने त्याला नोटीस जारी केली. या नोटिशीसंदर्भात चर्चा करण्यासाठी जेव्हा संबंधित कंत्राटदार नितीन बोकाडे याच्याकडे गेला, त्यावेळी त्याने ७० हजार रुपये न दिल्यामुळे ही नोटीस जारी केल्याचे सांगितले. तसेच जर हे पैसे दिले नाहीत तर अशा नोटिसा वारंवार येतील आणि तुला काम करू दिले जाणार नाही, अशी धमकी संबंधित कंत्राटदाराला दिली.
पालघर येथील घटना
कंत्राटदार जेव्हा ७० हजार रुपये घेऊन नितीन बोकाडे याच्याकडे गेला तेव्हा त्याने ऐनवेळी ७० हजारांच्या ऐवजी ७२ हजार रुपयांची मागणी केली. यानंतर संबंधित कंत्राटदाराने मुंबई सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे लेखी तक्रार केली. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर बोकाडे याने लाच मागितल्याचे आढळून आल्यानंतर सीबीआयने त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.