गोव्यातील एका हॉटेलमध्ये 4 वर्षांच्या मुलाच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सूचना सेठच्या अडचणीत सातत्याने वाढ होत आहे. आता सूचना 19 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत राहणार आहेत. याच दरम्यान, तिला 'रविवार'च्या भीतीने पछाडलं असल्याचं समोर आलं आहे. पतीने दर रविवारी मुलाला भेटावं असं तिला वाटत नव्हतं म्हणून ती इकडून तिकडे जात होती. त्यामुळेच सूचना सेठ आपल्या मुलासह आठवड्यातून दोनदा गोव्यात पोहोचली. रविवारी पती मुलाला भेटू नये म्हणून ती दोन वेळा गोव्याला गेल्याचं समोर आलं आहे.
इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, सूचना सेठ आपल्या मुलाच्या हत्येच्या आठवडाभरापूर्वी कर्नाटकमधून गोव्यात आली होती. गोव्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ती पाच दिवस राहिली. पोलीस सूत्रांनी सांगितलं की, सूचना सेठ 31 डिसेंबर 2023 (रविवार) रोजी गोव्यात आली आणि 5 दिवस येथे थांबली होती. तिच्यासोबत चार वर्षांचा मुलगाही होता. येथे फिरल्यानंतर ती 4 जानेवारी (गुरुवारी) आपल्या मुलासह बंगळुरूला परतली.
एफआयआरनुसार, गोव्याहून परतल्यानंतर सूचना सेठ दोन दिवस बंगळुरूमध्ये राहिली. दरम्यान, अचानक तिने पुन्हा गोव्याला जाण्याचा प्लॅन केला आणि 6 जानेवारीला (शनिवार) गोव्यात परतली. उत्तर गोव्यातील कँडोलिम परिसरात असलेल्या सोल बनयान ग्रँड हॉटेलमध्ये रुम क्रमांक 404 मध्ये चेक इन केलं होतं. ती हॉटेलमध्ये गेली तेव्हा तिचा मुलगाही तिच्यासोबत होता. 10 जानेवारीपर्यंत तिने बुकिंग आधीच केल्याची माहिती आहे. रिसेप्शनला आयडी कार्ड दिलं. 7 जानेवारी (रविवार) रात्री 9.10 च्या सुमारास सूचनाने हॉटेल कर्मचाऱ्यांना सांगितलं की ती एका अर्जंट कामासाठी बंगळुरूला जात आहे आणि त्यामुळे लवकर चेक आउट करायचं आहे.
"हॉटेलमधून बुक केली कॅब"
8 जानेवारी (सोमवार) रात्री 10 वाजता सूचनाने हॉटेलच्या रिसेप्शनला फोन केला आणि बंगळुरूला जाण्यासाठी कॅब बुक करण्याची विनंती केली. हॉटेलच्या ट्रॅव्हल डेस्कला हे बोलणं अतिशय विचित्र वाटलं. ट्रॅव्हल डेस्कवर असलेल्या व्यक्तीने सल्ला दिला की कॅबने बंगळुरूला जाण्याऐवजी फ्लाइटने जाणं खूपच स्वस्त होईल आणि वेळही वाचेल. पण, सूचनाने कॅबने बंगळुरूला जाण्याचा पुनरुच्चार केला आणि त्याच क्षणी कॅब बुक करण्यास सांगितलं. पैशाची काळजी करू नका, असंही ट्रॅव्हल डेस्कला सांगितलं.
8 आणि 9 जानेवारीच्या मध्यरात्री एक इनोव्हा कार हॉटेलमध्ये पोहोचली. सूचना रिसेप्शनपर्यंत पोहोचली, बिल भरलं आणि चेकआउट केलं. त्यानंतर ती बॅग घेऊन हॉटेलच्या बाहेर आली आणि बाहेर उभ्या असलेल्या इनोव्हा कारमध्ये बसतली. ही कार बंगळुरूहून गोव्याला रवाना झाली. ती आपल्या चार वर्षांच्या मुलासोबत हॉटेलमध्ये आली होती, पण चेकआऊट करून हॉटेलमधून बाहेर पडत असताना तिच्याकडे एकच बॅग होती. याच दरम्यान सूचनाच्या हॉटेलच्या खोलीत रक्त सापडल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यातून तिला पकडण्यात आलं. चित्रदुर्ग पोलिसांनी बॅग तपासली असता त्यात त्यांच्या मुलाचा मृतदेह आढळून आला.
"पती आणि मुलाला भेटू द्यायचे नव्हते"
रविवारी जेव्हा सूचना सेठ पहिल्यांदा गोव्यात पोहोचली, तेव्हा तिने पती वेंकटरमनला मुलगा आजारी असल्याचं सांगितलं, त्यामुळे ती त्याला भेटायला पाठवू शकत नाही असंही म्हटलं. त्यानंतर, ती पाच दिवस गोव्यात राहून गुरुवारी, 4 जानेवारी रोजी बंगळुरूला परतली. परंतु दोन दिवसांनंतर, तिला पुन्हा मुलगा त्याच्या वडिलांना भेटेल याबाबत चिंता वाटू लागली. यामुळेच तिने अचानक पुन्हा गोव्याला जाण्याचा प्लॅन बनवला आणि 6 जानेवारीला आपल्या मुलासह विमानाने पुन्हा गोव्यात पोहोचली आणि तिथेच चिमुकल्या लेकाची हत्या केली.