कर्नाटकच्या चित्रदुर्ग इथं एक हैराण करणारे प्रकरण समोर आले आहे. याठिकाणी एका आर्टिफिशियल इंटेलिजेंस कंपनीच्या महिला सीईओने तिच्या ४ वर्षाच्या मुलाची हत्या केली. त्यानंतर महिलेने मुलाचा मृतदेह बॅगेत घेऊन गोव्याहून कर्नाटकला जात होती. परंतु पोलिसांनी महिलेला अटक केली. या महिलेजवळ असलेला मुलाचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन पोस्टमोर्टमला पाठवला.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी महिला सूचना सेठचं लग्न २०१० मध्ये झाले होते. २०१९ मध्ये महिलेने मुलाला जन्म दिला. २०२० पासून तिचं पतीसोबत भांडण सुरू होते. हे प्रकरण कोर्टात गेले. ज्यानंतर दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. कोर्टाने वडिलांना दर रविवारी मुलाला भेटण्याची परवानगी दिली. कोर्टाच्या या आदेशाने महिला दडपणाखाली आली. वडिलांना मुलाला भेटू नये असं तिला वाटत होते. त्यासाठी तिने प्लॅन केला. महिला शनिवारी मुलाला घेऊन गोव्याला निघून गेली आणि तिथे हॉटेलमध्ये मुलाची हत्या केली.
मुलगा वडिलांना भेटू नये यासाठी निर्दयी महिलेने पोटच्या मुलाला कायमचं संपवलं. गोव्याच्या ज्या हॉटेलमध्ये महिला थांबली होती. तिथे तिने येताना तिच्या ४ वर्षीय मुलाला सोबत आणले होते. परंतु हॉटेलमधून निघताना महिलेसोबत मुलगा नव्हता. महिलेला एकटं जाताना पाहून हॉटेल स्टाफनं मुलाबाबत विचारणा केली तेव्हा मुलाला आधीच घरी पाठवले असं महिलेने सांगितले. त्यानंतर महिला हॉटेलमधून बाहेर पडल्यानंतर स्टाफने तिची रुम चेक केली तेव्हा रक्ताचे डाग आढळले. त्यानंतर हॉटेल स्टाफनं तात्काळ पोलिसांना माहिती दिली.
हॉटेलकडून माहिती मिळताच पोलिसांनी सूत्रे वेगाने फिरवली. ज्या टॅक्सी चालकानं महिलेला घेऊन गेला त्याला पोलिसांनी फोन केला. त्याची चौकशी केली असता ती महिला एकटी आहे असं त्याने सांगितले. त्यानंतर पोलिसांनी महिलेला घेऊन जवळच्या पोलीस ठाण्यात जायला सांगितले. त्यानंतर टॅक्सी चालकाने महिलेला पोलीस ठाण्यात नेले. परंतु ते कर्नाटकच्या चित्रदुर्ग परिसरातील होते. त्यानंतर गोवा पोलीस तिथे पोहचली आणि महिलेला ताब्यात घेतले. महिलेने गोव्याच्या कंडोलिम इथं ही घटना केली. मुलाच्या हत्येच्या आरोपाखाली पोलिसांनी तिला अटक केली.