देऊरवाडा/आर्वी : आर्वी तालुक्यातील जळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अचानक लागलेल्या आगीत विविध साहित्य जळून कोळसा झाल्याने आरोग्य विभागाचे तब्बल २ लाखांचे नुकसान झाले आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली असून बॅटरीच्या वायरने अचानक पेट घेतल्याने ही आग लागल्याचे आतापर्यंतच्या चौकशीत पुढे आले आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रातून धूर निघत असल्याचे लक्षात येताच एकच खळबळ उडाली. त्यानंतर काही कर्मचाऱ्यांनी मोठी हिम्मत करून आगीवर पाण्याचा मारा करून परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना पाहिजे तसे यश येत नसल्याने अग्निशमन विभागाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. माहिती मिळताच आर्वी नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या जवानांनी अग्निशमन बंबासह घटनास्थळ गाठून परिसरातील नागरिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविले. या आगीत प्राथमिक आरोग्य केंद्रातील विविध साहित्य जळून कोळसा झाल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र प्रशासनाचे सुमारे २ लाखांचे नुकसान झाले आहे.बॉक्स
तांत्रिक बिघाड ठरला कारणीभूतजळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात सौर ऊर्जेचे पॅनल आहे. याच सौर ऊर्जेच्या पॅनलच्या बॅटरी मध्ये काही तांत्रिक बिघाड हाेत अचानक वायरने पेट घेतला. बघता बघता आगीने रौद्ररुप धारण करीत प्राथमिक आरोग्य केंद्रातील टीव्ही, इन्व्हर्टर, सेट अप बॉक्स, बॅटरी जळून खाक झाल्याचे सांगण्यात आले.
दस्ताऐवज सुरक्षीत
अचानक लागलेल्या आगीत विविध साहित्य जळू खाक झाले असले तरी रुग्णालयातील कोणतेही महत्त्वाची कागदपत्रे जळाली नसल्याचे आणि ते पूर्णपणे सुरक्षीत असल्याचे जळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. पवन पाचोडे व डॉ. मिलिंद वर्मा यांनी सांगितले.