शाहजहांपूर - उत्तर प्रदेशच्या शाहजहांपूर इथं एका युवकाचं अपहरण करून त्याची हत्या करण्यात आल्याचं उघड झाले आहे. या युवकाचा मृतदेह बरेली येथील रेल्वे ट्रॅकवर सापडला. या प्रकरणी पोलिसांनी युवकाची पत्नी, वहिनीसह ६ जणांना अटक केली आहे. कुटुंबातील लोकांनीच युवकाची हत्या केल्याचं उघड होताच गावात खळबळ माजली.
गौसनगर परिसरात राहणारा सुजीत दारुच्या आहारी गेला होता. तो कमाईचा सर्व पैसा दारुत बरबाद करत होता. याचवेळी त्याची पत्नी विमला आणि वहिनीची भेट बरेली येथील मांत्रिक इरफानसोबत झाली. सुरुवातीला त्याने तंत्र मंत्रातून दारुचं व्यसन दूर करू असं त्यांना सांगितले. तरीही सुजीतची दारू सुटली नाही. त्यानंतर त्याची पत्नी विमलानं तांत्रिकाच्या मदतीने पतीचा काटा काढण्याचं ठरवलं.
पतीची हत्या करण्यासाठी पत्नी आणि वहिणीनं मांत्रिकाला २ लाख रुपये दिले. त्यानंतर मांत्रिकाने ४ सहकाऱ्यांच्या मदतीने दारु पाजण्याच्या बहाण्याने युवकाचं अपहरण केले. त्यानंतर बरेली त्याची हत्या करण्यात आली. या घटनेचा अपघाताचं रुप देण्यासाठी त्याचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर टाकण्यात आला. त्यानंतर काही दिवसांनी वाचलेले पैसे घेण्यासाठी मांत्रिक जेव्हा युवकाच्या पत्नीकडे गेला तेव्हा नातेवाईकांना त्याच्यावर संशय आला. त्यांनी या मांत्रिकाला पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर पोलिसांनी घटनेची तपासणी करत याचा खुलासा केला.
पोलिसांनी या प्रकरणी सुजीतची पत्नी विमल आणि वहिणीसह ६ जणांना अटक करून जेलमध्ये पाठवलं आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सुजीतला दारुचे व्यसन जडलं होते. दारु सोडवण्यासाठी पत्नी आणि वहिनी बरेलीच्या मांत्रिकांच्या संपर्कात आल्या. पतीचं दारूचं व्यसन सुटत नसल्याने त्रासलेल्या पत्नीनं पतीचा काटा काढण्याचं ठरवले. त्यानंतर पतीच्या हत्येचा कट रचला. त्यात मांत्रिकाने सहकाऱ्यांच्या मदतीने युवकाला संपवले. पोलिसांनी या घटनेतील सर्व आरोपींना पकडून जेलमध्ये पाठवले आहे.