जळगाव : ऑनलाईन अभ्यासाचा ताण आणि सतत मोबाईलवरील गेम या तणावातून दीप सुरेश रावतोडे (१५) या दहावीच्या विद्यार्थ्याने राहत्या घरात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी जुने भगवान नगरात उघडकीस आली. या घटनेने पालक वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, घटनेचे आणखी काही वेगळे कारण आहे का? याची पोलीस चौकशी करीत आहेत.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दीप सुरेश रावतोडे हा सेंट जोसेफ या इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा विद्यार्थी होता. नववी उत्तीर्ण झाल्यानंतर यंदा तो दहावीच्या वर्गात गेला होता. लॉकडाऊनमुळे शाळा बंद असल्याने प्रत्येक शाळेने ऑनलाईन अभ्यासक्रम सुरु केला आहे. त्याशिवाय खासगी क्लासेसने सुध्दा ऑनलाईन अभ्यास सुरु केला आहे. दीप याने या अभ्यासाचा ताण घेतल्याने भीतीपोटी त्याने रात्री पंख्याला ओढणी बांधून गळफास घेवून आत्महत्या केली. सकाळी साडे सात वाजता वडील सुरेश रावतोडे हे त्याला उठवायला गेले असता तो पंख्याला गळफास घेवून आत्महत्या केल्याचे दिसून आले. त्यांनी आरडाओरड केल्याने भाऊ चंदू धावून आले. रामानंद नगर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला.
लॉकडाऊन ठरतोय घातकदरम्यान, लॉकडाऊनमुळे बाहेर जाण्यासही बंदी असल्याने दीप हा मोबाईलवरच गेम खेळत होता. अभ्यास आणि गेम दोन्ही मोबाईलवर असल्याने तो दिवसरात्र त्यातच असायचा. यामुळे तो प्रचंड नैराश्यात आल्याची माहिती कुटुंबियांकडून देण्यात आली. दीप हा अतिशय हुशार व प्रेमळ होता. तो या टोकाला जाईल, असा विश्वासच पटत नाही. या घटनेमुळे कुटुंबाला जबर धक्का बसला आहे.दीप याच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ व काका असा परिवार आहे. या घटनेची रामानंद नगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वडील सुरेश रावतोडे हे न्यायालयात नोकरीला होते, मात्र त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन स्वत:चा इलेक्ट्रॉनिक्सचा व्यवसाय सुरु केला होता. तीन भावांचे एकत्र व आदर्श असे कुटुंब आहे. दरम्यान, लॉकडाऊनमुळे ऑनलाईन अभ्यासाच्या तणावातून दीप याने आत्महत्या केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले असल्याची माहिती तपासी अमलदार अनिल फेगडे यांनी दिली.
अन्य महत्वाच्या बातम्या...
बँकेला चुना लावणाऱ्यांविरोधात CBIनं दाखल केला गुन्हा; मुंबईतील २ खासगी कंपन्यांचाही समावेश
भाजपा नेत्या, TIKTOK स्टार सोनाली फोगाट यांना अटक
बाप की नरपिशाच्च? लॉकडाऊनमध्ये पोटच्या मुलीवर बलात्कार करून द्यायचा गर्भपाताचे औषध
सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येवर देशभरात चर्चा, SCनंही मानसिक आजाराबाबत केला सवाल