नवी मुंबई : कुटुंबीयांनी प्रेमविवाहाला विरोध केल्याने प्रियकराने खाडीपुलावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. यावेळी तिथे उपस्थित प्रेयसीने वेळीच पोलिसांना कळवून मदत मागितल्याने त्याचे प्राण वाचले आहेत. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी दोघांच्या कुटुंबियांना बोलावून त्यांचे समुपदेशन केले आहे.मंगळवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास वाशी खाडीपुलावर हि घटना घडली. मानखुर्द येथील महाराष्ट्रनगर परिसरात राहणारे एक प्रेमी युगुल त्याठिकाणी आले होते. दोघांमध्ये अनेक महिन्यांपासून प्रेमसंबंध असून त्यांचे लग्नासाठी प्रयत्न सुरु होते. परंतु दोघांच्या घरच्यांनी त्यांच्या प्रेमसंबंधाला विरोध केला होता. त्यामुळे मंगळवारी रात्री दोघेही वाशी खाडीपुलावर भेटून चर्चा करत होते. यावेळी कुटुंबियांकडून होत असलेल्या विरोधावरून दोघेही चिंतीत होते. त्याचवेळी तरुणाने पुलावरून खाडीत उडी मारली. तो पाण्यात बुडत असतानाच तरुणीने तात्काळ पोलिसांना फोनवरून घटनेची माहिती दिली. त्यानुसार वाशी पोलीस, सागरी पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेत मच्छिमार बांधवांना देखील मदतीसाठी बोलवले. त्यानुसार मच्छिमार महेश सुतार व अभिषेक जैसवाल हे त्याठिकाणी पोचले. त्यांनी पोलिसांसह बोटीने खाडीत पाहणी सुरु केली. यावेळी एक तरुण बुडताना असताना आढळून येताच सुतार यांनी त्याला मदतीचा हात देऊन प्राण वाचवले.
संतापजनक! १३ वर्षाच्या मुलीच्या अब्रूचे लचके तोडणाऱ्या शिक्षकाविरोधात गुन्हा
या घटनेनंतर तरुण तरुणीकडे चौकशी केली असता, त्यांच्या प्रेमसंबंधाला घरच्यांचा विरोध असल्याने तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समोर आल्याचे वरिष्ठ निरीक्षक संजीव धुमाळ यांनी सांगितले. त्यामुळे दोघांच्या कुटुंबियांना बोलावून समुपदेशन करून मुलांना पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.