मुंबई : मित्रांकडून सुरू असलेली मस्करी खरी समजून एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना दहिसरमध्ये घडली. धक्कादायक बाब म्हणजे, घटनेच्या दिवशी तरुणाला रुग्णालयात दाखल करण्याऐवजी नागरिक मोबाइलमध्ये फोटो आणि व्हिडीओ रेकॉर्डिंगमध्ये व्यस्त होते. या प्रकरणी दहिसर पोलीस अधिक तपास करीत आहेत.मूळचा नेपाळचा रहिवासी असलेला शेरबहादूर सिंग (३२) असे तरुणाचे नाव आहे. तो दहिसरच्या एका खासगी कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून काम करायचा.दोन दिवसांपूर्वी त्याच्या काही मित्रांनी त्याच्याशी मस्करी करत ‘पोलीस ठाण्यात तुझ्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे, त्यामुळे आता पोलीस तुला पकडणार आणि फासावर लटकवणार,’ अशी भीती दाखवली. त्या वेळी घाबरलेल्या सिंगने दारूच्या नशेत जवळच असलेल्या पानाच्या दुकानातील एक चाकू उचलला आणि तो स्वत:च्या गळ्यावर फिरवला.दहिसर पेट्रोलपंपजवळ एस.व्ही. रोड येथील वर्धमान इंडस्ट्रीयल इस्टेट परिसरात हा प्रकार घडला. त्यामुळे आसपासच्या लोकांनी स्वत:चे मोबाइल काढत रक्तबंबाळ झालेल्या सिंगचे फोटो काढण्यास आणि व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्यास सुरुवात केली.मात्र त्यातल्या एकानेही त्याला रुग्णालयात दाखल करण्याची तसदी घेतली नाही. अखेर या प्रकरणी पोलीस नियंत्रण कक्षावर फोन करण्यात आला आणि दहिसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्याला स्थानिक रुग्णालयातदाखल केले. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे.या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नसून पोलीस या घटनेची चौकशी करीत आहेत. मात्र सिंगला आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या प्रकारात तथ्य असेल तर संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याच्या भीतीने तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2019 6:05 AM