वर्धा : आजारपणाला कंटाळून ‘सुसाइड बॉम्बर’ बनून बँकेत प्रवेश करीत बँक व्यवस्थापकाला चक्क ५५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याची खळबळजनक घटना सेवाग्राम येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेत घडली. या घटनेने बँकेतील कर्मचाऱ्यांसह पोलीस यंत्रणेचीही तारांबळ उडाली होती. योगेश प्रकाश कुबडे (४२) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
बँकेत शाखा व्यवस्थापक चेतना जगदीश खोब्रागडे नेहमीप्रमाणे काम करीत असताना बँकेतील शिपाई योगेशला त्यांच्याकडे घेऊन आला. योगेशने त्यांना एक पत्र दिले. पत्रात ‘मी गंभीर आजाराने त्रस्त असून, ५५ लाख रुपये पाहिजे आहे.’ असे लिहिलेले होते. इतकेच नव्हे, तर मी ‘सुसाइड बॉम्बर’ बनून आलो आहे. बॉम्ब ॲक्टिव्हेट झाला असून, १५ मिनिटांचाच अवधी आहे. तुम्हाला जर रात्री आपल्या कुटुंबासह जेवण करायचे असेल तर पैसे द्या अन्यथा पूर्ण बँकेला बॉम्बने उडवून देईल, असेही पत्रात लिहिले होते. पत्र वाचून शाखा व्यवस्थापक हबकल्या.
मात्र, प्रसंगावधान राखत खोब्रागडे यांनी सेवाग्राम ठाण्यातील दोन महिला पोलीस शिपायांना लोनसंदर्भात काम असल्याचे सांगून बँकेत बोलाविले. त्यांना बघताच योगेशने तेथून पळ काढला. मात्र, कर्मचाऱ्यांनी आणि पोलीस शिपायांनी योगेशला पकडले. त्याच्या कमरेला बॉम्बसारखे काही तरी असल्याचे समजले. सेवाग्राम पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी बँकेत धाव घेत योगेशला ताब्यात घेत तपासणी केली असता बॉम्ब बनावट असल्याचे लक्षात आले. त्यामुळे सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. आरोपीकडे एअर गन आणि चाकूही सापडला.
असा केला बनावट बाॅम्ब - बनावट बॉम्ब तयार करण्यासाठी योगेशने पीव्हीसी पाइपचे छोटे तुकडे केले. त्यात सिमेंट भरून त्याला हिरव्या आणि पिवळ्या रंगाचे वायर जोडले. लाल रंगाचे पॉलिश मारून त्यावर ॲटोमॅटिक घड्याळ लावले. हा ‘बॉम्ब’ कमरेच्या पट्ट्यात अडकवला. शर्टाच्या आत लपवून तो बँकेत आला. योगेशने बॅंकेचा शिपाई ताराचंदच्या डोक्यावर एअर गन लावून बँकेत चलण्यास सांगितले.