मुंबई - शेअर बाजारात होणाऱ्या चढ - उतारामुले अनेक गुंतवणूकदारांचे लाखोंचं नुकसान होतं. मात्र, शेअर बाजार गडगडल्याने झालेल्या नुकसानामुळे निराश झालेल्या 63 वर्षीय वृद्धाने कांदिवली येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. विजय नाईक असं या मृत व्यक्तीचं नाव आहे. याप्रकरणी कांदिवली पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांना घटनास्थळी सुसाईट नोट सापडली असून नाईक यांच्या पत्नीने दिलेल्या जबाबत नाईक यांना शेअर बाजारात नुकसान झाल्याने नैराश्याच्या गर्तेत असल्याचे नमूद केले असल्याचे कांदिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पोंदकुले यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
नाईक हे कांदिवलीतील जिमखाना रोड, पोइसर येथील पुष्पांजली इमारतीत राहत होते. एका खासगी कंपनीत कामाला असलेले विजय हे काही महिन्यांपूर्वीच निवृत्त झाले. निवृत्तीनंतर ते शेअर बाजारात गुंतवणूक करत होते. आपल्या आयुष्यभराची जमापुंजी त्यांनी शेअर बाजारात गुंतवली होती. काल शेअर बाजारात त्यांनी कमालीची उलाढाल केली. मात्र,शेअर बाजार गडगडल्याने नाईक यांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे नाईक मानसिक तणावात गेले होते. नैराश्येत असलेल्या नाईक यांनी मुलगी कामावर गेल्यानंतर आणि पत्नी मंदिरात गेल्यानंतर घरातील सिलिंग पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. काल दुपारच्या वेळेस घरकाम करण्यासाठी मोलकरीण आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर कांदिवली पोलिसांत अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी भगवती रुग्णालयात नेण्यात आला होता.