वडखळ : व्याजाने घेतलेले पैसे परत करण्यासाठी होत असलेल्या त्रासाला कंटाळून पेण तालुक्यातील दिव गावातील तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी वडखळ पोलिस ठाण्यात पैसे देणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी एकाला अटक करण्यात आली असून, दोन फरार आहेत.विजय म्हात्रे (२७) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. म्हात्रे यांनी आपल्या वैयक्तिक कामासाठी साजन पाटील, मयूर धांडे व भूषण म्हात्रे (रा.वाशी, ता. पेण) यांच्याकडून सहा महिन्यांपूर्वी व्याजाने पैसे घेतले होते. तीन महिने व्यवस्थित व्याज दिल्यानंतर काही कारणास्तव विजय याला व्याज देता आले नसल्यामुळे या तिघांनी विजयच्या घरासमोर येऊन शिवीगाळ व मारहाण केली. असा प्रकार दोन ते तीन वेळा घडला. त्यांच्या या त्रासाला कंटाळून विजय याने १७ नोव्हेंबर रोजी दिव येथील आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. या तरुणाला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केले याबाबतची तक्रार विजयची बहीण विजया रमेश म्हात्रे हिने वडखळ पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार साजन, मयूर, भूषण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी भूषणला अटक केली असून अन्य दोघांचा पोलिस शोध घेत आहेत. पोलिस निरीक्षक तानाजी नारनवर तपास करीत आहेत.
या गुन्ह्यातील तीनही आरोपींवरुद्ध महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ नुसार गुन्हा दाखल करून अवैध सावकारी धंद्याला आळा घालणे गरजेचे आहे. या आरोपींना राजकीय अभय असल्याने सावकारी गुन्हा दाखल होत नसेल तर आम्हाला आंदोलन करावे लागेल.- विवेक म्हात्रे, सरपंच, ग्रामपंचायत दिव