मुंबई - मुलुंड येथील वसंत गार्डन परिसरातील विलोझ टॉवरमध्ये राहणाऱ्या हॉटेल व्यावसायिकाने स्वतःकडील रिव्हॉल्वरने गोळ्या झाडून घेत आत्महत्या केली आहे. ही घटना काल उशिरा रात्री १२.३० वाजताच्या सुमारास घडली आहे. राहत्या घरी हॉटेल व्यवसातिक सतनाम सिंग प्यारासिंग बोपाराई (वय - ५४) असं मृत व्यक्तीचे नावं आहे. याप्रकरणी अपघाती मृत्यूची मुलुंड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.०
सतनाम हे भांडुपमधील शेरा हॉटेलचा मालक असून ते बोपाराईज् मार्शल सिक्युरिटीचे व्यवस्थापकीय संचालक देखील होते. मुलुंडच्या वसंत गार्डन येथील विलोज टाँवरच्या पंधराव्या माळ्यावर राहत होते. मागील अनेक दिवसांपासून होत असलेल्या नुकसानामुळे ते मानसिक तणावात होते. याच नैराक्षेतून त्यांनी रविवारी रात्री 12:30 वाजताच्या सुमारास घरातील बेडरूममध्ये स्वत:च्या परवाना धारक रिव्हॉल्वरने गोळी झाडून आत्महत्या केली. गोळीचा आवाज ऐकून घरातल्यांनी बेडरूमच्या दिशेने धाव घेतली. त्यावेळी रक्ताच्या थारोळ्यात सतनाम पडलेले घरातल्यांना आढळून आले. घरातल्यांनी त्यांना तातडीने फोर्टीज रुग्णालयात दाखल केले. माञ डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. मुलुंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीपाद काळे यांनी ''लोकमत''शी बोलताना ही आत्महत्या नैराश्येतून झाली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. तसेच त्यांना दारूचे व्यसन जडले असल्याकारणाने त्याचा लिव्हर देखील खराब झाला होता असल्याची माहिती काळे यांनी दिली. मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मुलुंड पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळाहून एक रिव्हॉल्वर, रिकामं काडतूसं आणि 5 जिवंत राऊंड जप्त केले आहे. या प्रकरणी मुलुंड पोलिस अधिक तपास करत आहेत.