पुणे : पहिल्या पतीपासून घटस्फोटानंतर दुसऱ्या पतीची पटत नसल्याने ती वेगळी राहू लागली़. आपल्या जीवनाचा आधार शोधण्यासाठी तिने मुलाला दत्तक घेतले़. आता तो मुलगा मोठा झाल्यावर तो शारीरिक व मानसिक त्रास देऊन बदनामी करीत होता़. शेवटी या त्रासाला कंटाळून सोलापूर येथील राहणाऱ्या महिलेने पुण्यातील लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली़. अर्चना लक्ष्मण परमार (वय ४५, रा़.सोलापूर) असे या महिलेचे नाव आहे़. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी तिचा मुलगा सुरज लक्ष्मण परमार (वय २४, रा़. सोलापूर) याला अटक केली आहे़. याप्रकरणी त्यांचा भाऊ राजेश रमणीकलाल वोरा (वय ४६, रा़. सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे़. अर्चना यांचे १९९२ मध्ये पहिले लग्न झाले होते़. त्यांना एक मुलगा व एक मुलगी होती़. मात्र, सासरच्या त्रासाला कंटाळून सुमारे ५ वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला़. दोन्ही मुले पतीसमवेत राहतात़. त्यानंतर २००२ मध्ये त्यांनी दुसरा विवाह केला़. पण दुसऱ्या पतीबरोबर न पटल्याने त्यांच्याशी घटस्फोट घेऊन त्या स्वतंत्र राहू लागल्या़. त्यांनी सुरज याला दत्तक घेतले होते़. त्या हिप्नॉटिझम शिकविण्याचे क्लासेस घ्यायच्या़. त्यांचा मुलगा सुरज हा काही कामधंदा करायचा नाही़. आईला मारहाण करायचा व तिची बदनामी करायचा़. या त्रासाला कंटाळून त्या ५ सप्टेंबरला पुण्यात आल्या़. स्वारगेट येथील हॉटेल सुंदरम येथे रात्री उतरल्या़. त्यांनी तेथे गळफास घेऊन आत्महत्या केली़. दुसऱ्या दिवशी सकाळी हा प्रकार उघडकीस आला़. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी सुसाईट नोट लिहून ठेवली होती़. त्यात मुलाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे़. स्वारगेट पोलिसांनी सुरज परमार याला अटक केली आहे.
दत्तक मुलाच्या त्रासाला कंटाळून आईची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2019 7:24 PM