भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना गुजरातमधील सुरत शहरात घडली आहे. दीपिका पटेल असं या आत्महत्या करणाऱ्या महिला पदाधिकाऱ्याचे नाव आहे. दीपिका यांनी राहत्या घरात ओढणीने गळफास घेऊन आपले जीवन संपवले.
याप्रकरणी मिळालेली अधिक माहिती अशी की, ३४ वर्षीय दीपिका पटेल या सुरतमधील अलथाण परिसरात वास्तव्यास होत्या. काही वर्षांपूर्वी त्यांचं लग्न नरेशभाई पटेल यांच्याशी झालं असून त्यांना दोन मुले आणि एक मुलगी होती. दीपिका यांचे पती शेती करत होते, तर दीपिका या भाजपच्या महिला आघाडीत सक्रिय होत्या. दीपिका पटेल या दोन वर्षांपूर्वी भाजप नगरसेवक चिराग सोळंकी यांच्या संपर्कात आल्या होत्या. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी याच सोळंकी यांना शेवटचा फोन केला होता.
"मी जीवन संपवत आहे"
दीपिका पटेल यांनी भाजप नगरसेवक चिराग सोळंकी यांना मी माझं जीवन संपवत असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर चिराग सोळंकी तातडीने दीपिकाच्या घरे पोहोचले. सीसीटीव्ही फुटेजमधून हे स्पष्ट झालं आहे. कुटुंबाकडून करण्यात आलेल्या आरोपांनंतर पोलिसांनी चिराग सोळंकी यांची तब्बल तीन तास चौकशी केली.
आत्महत्या करत असल्याचं सांगितल्यानंतर चिराग सोळंकी यांनी वारंवार फोन करूनही दीपिकाने फोन उचलला नाही. त्यामुळे चिराग थेट तिच्या घरी पोहोचले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. दीपिकाने ओढणीने गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं होतं.
दरम्यान, याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून दीपिका आत्महत्येस कोणी प्रवृत्त केलं, याबाबतचा शोध घेतला जात आहे.