जळगाव : एसटी महामंडळातील कमी पगार, अनियमिततेला कंटाळून जळगाव आगारात वाहक म्हणून नोकरीला असलेल्या मनोज अनिल चौधरी (३०, रा.कुसुंबा, ता.जळगाव) या कर्मचाऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी ८.३० वाजता उघडकीस आली. आत्महत्या करण्यापूर्वी मनोजने चिठ्ठी लिहिली असून त्यात एसटी महामंडळातील कार्यपद्धती व आपले मराठी माणसांचे ठाकरे सरकार (शिवसेना) हेच माझ्या आत्महत्येला जबाबदार असल्याचा उल्लेख केला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज परिवारासह कुसुंबा येथे वास्तव्याला होता. सोमवारी सकाळी साडे आठ वाजले तरी वरच्या मजल्यावरुन खाली आला नाही म्हणून भाऊ त्याला उठवायला गेला असता त्याने हॉलमध्ये गळफास घेतल्याचे दिसले. शेजारीच त्याने एका वहीच्या पानावर सात आठ ओळींची चिठ्ठी आढळून आली. भाऊ व मित्रांनी त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात आणले, मात्र तेथे डॉक्टरांनी मृत घोषित केले. यावेळी भाऊ, पत्नी व इतर नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. दरम्यान, याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सतत लांब पल्ल्याची ड्युटीजिल्हा रुग्णालयात मनोजचा भाऊ सागर याने ‘लोकमत’ ला दिलेल्या माहितीनुसार, मनोज हा चार वर्षापासून एसटी महामंडळात वाहक म्हणून कार्यरत होता. सुरुवातील मुक्ताईगर येथे ड्युटी होती. त्यानंतर जळगाव आगारात बदली झाली. मनोज याची ड्युटी सतत लांब पल्ल्याच्या गाड्यांवर लावली जात होती. तो अनेकांची ड्युटी विभागून घेत होता, मात्र त्याची वेळ यायची तेव्हा त्याला कोणीच मदत करीत नव्हते. त्यात तीन महिन्यापासून पगार नाही. झाला तर वेळेवर होत नाही. त्यात कमी पगार, अनियमतता. सरकारचा कारभार याला कारणीभूत आहे. हे त्यांनी चिठ्ठीतच लिहीले आहे. माझा भाऊ गेला, त्याला कोण परत आणून देणार असे म्हणत आक्रोश करीत होता.मनोज याच्या पश्चात वडील अनिल चौधरी, पत्नी ऐश्वर्या, भाऊ सागर व भावजयी असा परिवार आहे. दोन्ही भावंड लहान असतानाच आईचे निधन झाले आहे. मनोज व सागर दोघं भाऊ एकमेकांचे साडू आहेत. त्यांची सासरवाडी जामनेर येथील आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांनी रुग्णालय गाठून महामंडळाविषयी संताप व्यक्त केला. आमदार सुरेश भोळे यांनीही रुग्णालयात येऊन मनोजच्या कुटुंबीयांना धीर देण्याचा प्रयत्न केला.
काय म्हटले आहे चिठ्ठीतएसटी महामंडळातील कमी पगार व त्यातील अनियमितता यास कंटाळून मी आत्महत्या करीत आहे. यास जबाबदार एसटी महामंडळातील कार्यपद्धती व आपले मराठी माणसांचे ठाकरे सरकार आहे. (शिवसेना) माझ्या घरच्यांचा यात काहीही संबंध नाही. संघटनांनी माझा पी.एफ.व एलआसी माझ्या परिवाराला मिळवून देण्याचा प्रयत्न करावा. ही विनंती.आपला कृपाभिलाषीमनोज अनिल चौधरीवाहक क्र.४९४३जळगाव आगार