रेणापूर (जि. लातूर) : खरोळा शिवारात एका पडक्या विहिरीत मृतदेह पोत्यात बांधून पुरल्याची घटना उघडकीस आल्यानंतर रेणापूर पोलिसांनी मंगळवारी दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. दरम्यान, सदर प्रकरणातील मयताची आरोपी पत्नी व प्रियकर या दोघांनीही गेल्या पंधरा दिवसांत वेगवेगळ्या दिवशी खुनाचा गुन्हा दाखल होण्यापूर्वीच आत्महत्या केली.
लातूर जिल्ह्यातील रेणापूरनजीक असलेल्या खरोळा येथील मयत लखन ऊर्फ संदीप बालाजी राऊतराव (३०) आणि मनीषा (२६) यांचा पाच-सहा वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी अपत्ये आहेत. लग्नाच्या काही वर्षानंतर लखन आणि मनीषामध्ये चारित्र्याच्या संशयावरून सतत वाद होऊ लागले. सासरी होणाऱ्या या त्रासाबद्दल मनीषाने माहेरी आई, वडिलांना सांगितले होते. दरम्यान, हा वाद पुढे वाढतच गेला. त्यानंतर २७ मे रोजी मनीषाने स्वत:च्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याबाबत मनीषाच्या वडिलांच्या तक्रारीवरून पती लखन राऊतराव आणि त्यांचा भाऊ व वडिलांविरुद्ध रेणापूर पोलिसांत ३१ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यामध्ये विवाहितेचा दीर आणि सासऱ्याला अटकही करण्यात आली होती. मात्र, पती लखन हा २६ मे पासूनच गायब होता. त्याच्या शोधात नातेवाईकांसह पोलीसही होते. पोलिसांनी अधिक खोलात जाऊन चौकशी केली असता या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली. मयत मनीषा व गावातील विजय छपरे यांचे प्रेमसंबंध समोर आले. लखनचा खून करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी मयत मनीषा आणि विजय छपरे याच्याविरुद्ध गु.र.नं. ३९५/२०२० कलम ३०२, २०१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोनि. गोरख दिवे यांनी सांगितले.
६ तासांत पोलिसांनी लावला छडा... गायब असलेला लखन, पत्नी मनीषा आणि विजय छपरे या दोघांच्या आत्महत्या या घटनांनी पोलीस चक्रावून गेले. लखन गायब असल्याने पोलिसांना तपासाचा धागाच सापडत नव्हता. अखेर सोमवारी दुपारी लखनचा मृतदेह गावानजीकच्या ओसाड विहिरीत पोत्यात बांधून पुरल्याचे आढळून आले. लखनचा मृतदेह सापडल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी विद्यानंद काळे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली. लखनचा खून करून पुरावा नष्ट केल्याच्या निष्कर्षाप्रत पोलीस पोहोचले. मंगळवारी याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा छडा पोलिसांनी अवघ्या सहा तासांत लावला.
अब्रू जाईल या भीतीने केली आत्महत्यापोलिसांनी विजय छपरेला चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखविताच विजय छपरेने आपल्या प्रेमाची कबुली दिली. चौकशीनंतर पोलिसांनी त्याला सोडून दिले. मात्र, आपण केलेले कृत्य उघडकीस आले. यातून आपली अब्रू जाईल, असा विचार करून विजय छपरेने ६ जून रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली.