जळगाव - घटस्फोटीत तसेच दोन मुले असलेल्या तरुणीशी विवाह केल्याने काही जवळचे नातेवाईक सतत टोमणे मारत असल्याने तणावात आलेल्या निकेश तिरसिंग राजपूत (२७, मुळ रा. कुसुंबा, ता.जळगाव) या तरुणाने राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी रात्री साडे अकरा वाजता खेडी येथे घडली. निकेश याचे दोन महिन्यांपूर्वीच मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्न झाले होते. त्यानंतर तो पत्नीसह खेडी येथे भाड्याच्या घरात वास्तव्याला आला होता.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे दत्तमंदिर जवळ निकेश तिरसिंग राजपूत हा आई, वडीलांसह वास्तव्याला होता.लग्नानंतर पत्नी मीनासह खेडी येथे भाड्याची खोली करुन रहात होता. शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास निकेश घरी आल्यानंतर थोडा तणावात होता. कोणाला काही न सागता मागच्या खोलीत जाऊन आतुन कडी लावून घेतली. रात्री ११.३० वाजता पत्नीला निकेशने घरातील छताच्या कडीला दोरी बांधून गळफास घेतल्याचे दिसून आले. पत्नीने आरडाओरड करत हा प्रकार शेजारी व नातेवाईकांना सांगितला. मध्यरात्री रात्री दीड वाजेच्या सुमारास देवकर आयुर्वेद रुग्णालयात नेले असता तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी निकेशला मृत घोषित केले. या संदर्भात एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास महेंद्र गायकवाड व शांताराम पाटील करीत आहे.
मोठा उद्योग उभारण्याचे होते नियोजननिकेश तिरसिंग राजपूत (पाटील) याचे दोन महिन्यांपूर्वीच मेहरुण परिसरातील देवळात खेडी येथील मीना सोबत लग्न झाले होते. समाजात अजूनही घटस्फोटीत महिलेसोबत लग्न करण्यास अनेकांचा विरोध आहे. निकेश याने एक प्रकारे आदर्श विवाह केलेला व कुटुंबाची संमती असतानाही जुन्या विचारातील काही नातेवाईकांकडून निकेशला टोचून बोलले जात असल्याची माहिती जवळच्या लोकांकडून देण्यात आली. निकेशचा भाऊ दुबई येथे असून तो त्याला काही दिवसातच उद्योग सुरु करुन देणार होता. निकेशच्या पश्चात आई,वडील तीन भाऊ असा परिवार आहे.