नवी दिल्ली : महाठक सुकेश चंद्रशेखर याच्याकडून लाच घेतल्याप्रकरणी दिल्लीतील रोहिणी कारागृहाच्या ८१ अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कैदेत असतानाही सुकेशने अख्खे तुरुंग प्रशासन हाताशी धरून आपला गोरखधंदा सुरू ठेवला होता. सुकेशला त्याच्या हस्तकांशी संपर्क साधता यावा यासाठी तुरुंग अधिकारी मोबाईल फोनसह इतर सुविधा त्याला पुरवित होते. ही बाब पुराव्यानिशी समोर आल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने या अधिकाऱ्यांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. हे अधिकारी त्याच्याकडून दर महिन्याला दीड कोटी रुपये घेत होते, असे सांगण्यात आले.
अनेकांची फसवणूक व मनी लाँड्रिगच्या प्रकरणात सुकेश कारागृहात कैद आहे. तुरुंग अधिकारी सुकेशकडून पैसे घेत असल्याचे समोर आल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (इओडब्ल्यू) गेल्या महिन्यात मोक्काखाली ८ तुरुंग अधिकाऱ्यांना अटक केली होती. सुकेश तुरुंग अधिकाऱ्यांच्या मदतीने तुरुंगातून संघटित गुन्हेगारीचे रॅकेट चालवत होता.
एक कर्मचारी दर महिन्याला त्याच्याकडून दीड कोटी रुपये घेऊन ते अधिकारी व कर्मचाऱ्यांना वाटत होता, अशी कबुली या अधिकाऱ्यांनी चौकशीदरम्यान दिली. सुकेशला मोबाईलच नाही, तर स्वतंत्र बरॅकही देण्यात आला होता, असेही त्यांनी सांगितले होते.
तुरुंगाचे अख्खे प्रशासन लाचखोर; पैसेवाटपाच्या नोंदीएका तुरुंग अधिकाऱ्याच्या फोनमध्ये सुकेशकडून घेतलेले पैसे कोणाकोणाला वाटप करण्यात आले, याच्या नोंदी आढळून आल्या. एका हस्तलिखित पानावर अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे असून, त्यांच्या नावासमोर त्यांना किती रक्कम दिली गेली याचा उल्लेख आहे. धक्कादायक बाब म्हणजे तुरुंगातील जवळपास सर्वांनाच लाच दिली गेल्याचे तसेच सुकेशकडून या सर्वांना नियमित पैसे मिळत होते, असे स्पष्ट झाले.
सहा महिने उलटूनही परवानगीची प्रतीक्षाचएफआयआर दाखल करण्यापूर्वी दिल्ली पोलिसांनी दिल्ली तुरुंग प्रशासनाच्या महासंचालकांना १० जानेवारी रोजी पत्र पाठवून चौकशीची परवानगी मागितली होती. प्रशासनाने हे पत्र पुढे दिल्ली सरकारच्या दक्षता संचालनालयाला पाठवले. आर्थिक गुन्हे शाखेला लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये तपासाचा अधिकार नाही, असे संचालनालयाने कळवले. त्यावर आपल्याला अधिकार आहे, असे सांगत आर्थिक गुन्हे शाखेने तपासाची परवानगी मागितली. सहा महिने उलटले अद्यापही ही परवानगी मिळालेली नाही.
सुकेश म्हणतो, अधिकारीच मागतात खंडणीतुरुंग अधिकारी सातत्याने खंडणी मागत असून, त्यांच्यापासून आपल्या जीवाला धोका आहे, असा आरोप करत जूनमध्ये सुकेश आणि त्याच्या पत्नीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. गेल्या दोन वर्षांत तिहार मधील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपल्याकडून साडेबारा कोटी रुपये उकळल्याचा आरोपही त्याने केला होता.
सुकेशच्या बराकीतील कॅमेऱ्यासमोर अडथळेदिल्ली पोलिसांनी तुरुंगातील १० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे १० जुलै ते १० ऑगस्ट २०२१ दरम्यानचे फुटेज हस्तगत केले. यात सुकेशच्या बराकीतील कॅमेऱ्यांचाही समावेश आहे. सुकेशच्या बराकीतील कॅमेऱ्याचे फुटेज मिळू नये यासाठी त्याच्यासमोर पडदे लावल्याचे तसेच मिनरल वॉटरच्या बाटल्यांचे बॉक्स समोर ठेवल्याचे आढळून आले. कॅमेऱ्यासमोरील हे अडथळे हटविण्यासाठी प्रशासनाने काहीही केले नाही.