लखनौ – उत्तर प्रदेशच्या प्रतापगड जिल्ह्यात एका टीव्ही पत्रकाराचा रविवारी मृत्यू झाला आहे. हा मृत्यू अपघातामुळे झाल्याचं पोलिसांचे म्हणणं आहे. मात्र मृत्यूच्या एक दिवस अगोदरच पत्रकाराने पोलिसांना पत्र लिहून त्याच्या जीवाला धोका असल्याचं कळवलं होतं. जिल्ह्यातील अवैध दारू बनवणाऱ्यांविरोधात पत्रकाराने मोहीम सुरू केली होती. त्यामुळे या लोकांकडून सातत्याने त्याला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत होत्या असं त्याने पत्रात म्हटलं होतं.
प्रतापगडचे पोलीस अधिकारी सुरेंद्र द्विवेदी म्हणाले की, पत्रकार सुलभ श्रीवास्तव हे रविवारी रात्री ११ च्या सुमारास मीडिया कव्हरेजनंतर बाईकवरून घरी परतत होते. तेव्हा विटेच्या भट्टीजवळ त्यांचं बाईकवरील नियंत्रण सुटलं आणि ते खाली पडले. काही मजुरांनी त्यांना अपघाताच्या इथून उचललं. त्यांच्या मित्रांना माहिती कळवली आणि रुग्णवाहिका बोलावली. अपघातात श्रीवास्तव यांचा प्रचंड मार लागला होता. त्यामुळे तातडीने त्यांना जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र त्याठिकाणी डॉक्टरांनी श्रीवास्तव यांना मृत घोषित केले.
सुरुवातीच्या तपासात सुलभ श्रीवास्तव बाईकवरून एकटे जात होते. तेव्हा रस्त्यात असलेल्या एका हँडपंपला धडकल्यामुळे ते खाली पडले. दुर्घटनास्थळी घेतलेल्या फोटोमध्ये श्रीवास्तव जमिनीवर पडलेल्या अवस्थेत आढळले त्यांच्या चेहऱ्यावर जखमा होत्या. त्यांचा शर्ट पूर्णपणे फाटला होता असं पोलीस म्हणाले. विशेष म्हणजे एक दिवसाआधीच श्रीवास्तव यांनी पोलिसांना पत्र लिहिलं होतं. या पत्रात त्यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचा उल्लेख होता.
सोशल मीडियात हे पत्र व्हायरल झालं आहे. ज्येष्ठ पत्रकार यांनी हे पत्र समोर आणलं. या पत्रात लिहिलं होतं की, जिल्ह्यातील दारू माफियांविरोधात माझी एक बातमी ९ जून रोजी डिजिटल माध्यमावर प्रकाशित करण्यात आली होती. त्यानंतर या रिपोर्टची चर्चा सर्वत्र पसरली. जेव्हा मी घरी पोहचलो तेव्हा असं वाटलं कोणी माझा पाठलाग करतंय. माझ्या सोर्सनुसार दारू माफिया माझ्या रिपोर्टमुळे चांगलेच भडकले होते. त्यामुळे मला नुकसान पोहचवण्यासाठी ते काहीही करू शकतात. त्यामुळे माझं कुटुंबही चिंतेत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या पत्राची दखल घेत त्यादृष्टीने तपास करण्याचे आदेश दिले आहेत. तर दुसरीकडे या घटनेवरून काँग्रेसने उत्तर प्रदेशातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे.