धुळे : उज्जैनहून देवदर्शन करुन परतणाऱ्या प्रवाशांनी रात्रीला झोपण्यासाठी आपली कार आर्वी शिवारात असलेल्या पेट्रोल पंपाजवळ उभी केली होती. गाडीतील प्रवासी झोपलेले असताना अचानक मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या वाहनावर दरोडेखोरांनी तुफान हल्ला चढविला. यावेळी पुण्याच्या रेखाचित्रकारासह सह प्रवाशांना दरोडेखोरांनी मारहाण केली. तसेच चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील रोकड, मोबाईल, सोन्याचे पदक यांसह किंमती वस्तू लुटून घटनास्थळावरुन पोबारा केला असल्याची घटना घडली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसही चक्रावले होते. दरोडेखोरांचा छडा लावण्यासाठी धुळे तालुका पोलिसांसह धुळे एलसीबीने तपासाची चक्रे वेगात फिरविण्यास सुरुवात केली परिणामी, अवघ्या आठ ते नऊ तासांतच लुटमार करणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात अखेर धुळे एलसीबीला यश आले आहे. धुळे पोलिसांनी तिघा दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या असून टोळीतील उर्वरित तिघांचा देखील तपास युद्ध पातळीवर सुरू असल्याची माहिती पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी दिली.
दरोडेखोर हे मध्यप्रदेशाच्या दिशेने पसार होत असल्याची खात्रीशिर माहिती धुळे एलसीबीचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळताच त्यांनी पथकाला सापळा रचण्याच्या सूचना केल्यात. संशयित दरोडेखोरांचे वाहन MH 14 BX 1573 हे मध्यप्रदेशातील सेंधवाकडे जात असताना त्यांना हाडाखेड गावाजवळच अडविण्यात आले. यावेळी पोलिसांनी संशयितांना वाहनासह ताब्यात घेवून त्यांची विचारपूस केली. त्यांना पोलिसांनी खाक्या दाखवताच त्यांनी अन्य साथीदारांसह आर्वीजवळील लुटीची कबुली दिली.
या दरम्यान पोलिसांनी राजेश परशुराम राठोड (31), रा. मांजरी तांडा, ता. मुखेड, जि. नांदेड, जगदिश शिवाजी पवार (19), रा. कमलेवाडी, ता. मुखेड, जि. नांदेड व योगेश शंकर पवार (34), रा. बेळी, ता. मुखेड, जि. नांदेड यांना जेरबंद केले आहे. या लुटीच्या वेळी त्यांचेसह अंकुश डेम्पु पवार, सलीम आणि छोटू या टोळीतील साथीदारही गुन्ह्यात सहभागी होते. ते शिरपूर येथून खाजगी बसने औरंगाबादला रवाना झाल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितले. त्यांचा देखील पोलिस कसून तपास पोलीस करीत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी यावेळी दिली.