लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आर्थर रोड कारागृहाचे अधीक्षक नितीन वायचळ आजारी असल्याने, कारागृहाची जबाबदारी तळोजा उजळणी पाठ्यक्रम केंद्राचे प्राचार्य जे. एस. नाईक यांच्यावर सोपविण्यात आली आहे. वायचळ यांना आजारातून बरे झाल्यानंतर मूळ नियुक्ती असलेल्या रत्नागिरी विशेष कारागृहात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
आर्थर रोड कारागृहात लॉकडाउनदरम्यान १५८ कैदीआणि २६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. यात कारागृह अधीक्षक नितीन वायचळ यांच्या चालकालाही लागण झाल्याने वायचळ यांनी स्वत:ला क्वारंटाइन करून घेतले. दरम्यान, कोरोनाबाधित कैद्यांवर कारागृहातील विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत. त्यामुळे कारागृहाचे लॉकडाउन काढण्यात आले आहे. २९ मे रोजी वायचळ यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, आणखी काही दिवस हजर राहणे शक्य नसल्याची माहिती वरिष्ठांना फोनद्वारे दिली. त्यानुसार, वायचळ यांना मूळ नियुक्ती असलेल्या रत्नागिरी विशेष कारागृहाकडे पुन्हा पाठविण्यात आले आहे. बरे झाल्यानंतर त्यांना रत्नागिरी कारागृहाचा कारभार सांभाळण्याचे आदेश देण्यात आले. तर आर्थर रोड कारागृहाच्या अधीक्षकपदी तळोजा उजळणी पाठ्यक्रम केंद्राचे प्राचार्य जे. एस. नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कारागृह विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक दीपक पाण्डेय यांनी याबाबतचे आदेश काढले.तीन दिवसांत ३००हून अधिक पोलिसांना कोरोनाराज्यभरात गेल्या तीन दिवसांत ३००हून अधिक पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. शनिवारी पहाटे ४ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार १,३३० कोरोनाबाधित पोलिसांवर उपचार सुरू आहेत. यात १७५ अधिकाऱ्यांचा समावेश असून २६ पोलिसांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे.