सूरज पवारमडगाव - वासंती गावडे या खून प्रकरणी सिरियल कीलर महानंद नाईक याची जन्मठेपेची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने कायम केली. शिक्षेविरुध्द महानंद याने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्याचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावताना जन्मठेपेच्या शिक्षेवर शिक्कामोत्तब केला. 1995 साली वासंती गावडे खून प्रकरण घडले होते. अत्यंत थंड डोक्याने महानंदाने तिच्यावर लैंगिक अत्याचार करुन तिचे दागिने लुटून तिची निर्घृण हत्या केली होती.तरवळे - शिरोडा येथील महानंद नाईक याला फोंडा पोलिसांनी अटक केली होती. यावेळी संशयिताने सोळा खून केल्याचे उघडकीस आले होते. यातील बहुतेक खून प्रकरणात त्याची निर्दोष सुटका झाली आहे. महानंद याच्या खूनाच्या मालिकाच उघड झाल्याने त्यावेळी संपूर्ण गोवा हादरुन गेला होता. वासंती गावडे ही खडपाबांध - फोडा येथील राहूल अर्पाटमेन्ट येथे एका फ्लॅटात घरकामाला होती. महानंदने तिच्याशी मैत्री करुन 10 सप्टेंबर 1995 साली तिच्याशी विवाहाचा प्रस्ताव ठेवला होता. वासंती हिच्या वडीलाचे निधन झाले होते. तिचे मावसभाउ रामनाथ गावडे व सोनू गावडे हे तिची देखभाल करीत होते. महानंदने 11 सप्टेंबर 1995 साली आपल्या आई - वडिलांची भेट घालून देण्याच्या बहाण्याने वासंतीला सर्व दागदागिने घालून फोंड्यातील मिनिनो हॉटेलजवळ येण्यास सांगितले होते. वासंतीचे फोंडा येथील स्टेट बँकेत खाते होते. आपल्या कमाईचे पैसे ती या बँकेच्या खात्यात भरत होती. महानंदने गोड बोलून तिच्याकडून ही माहितीही काढून घेतली होती. तिच्या बचतखात्यावर रक्कम असल्याने येताना पासबूकही सोबत घेउन येण्यास त्याने सांगितले होते. वासंतीचे पासबूक तिच्या मावसभावाकडे होते. बँक पासबूकची मागणी केल्यानंतर तिच्या मावसभावाने तिला यासंबधी विचारले होते. आपल्या दोन्ही मावसभावांना घेउन वासंती 11 सप्टेंबरला मिनिनो हॉटेलजवळ गेली होती. त्या दोघांना बघून महानंद गडबडला होता. मात्र, त्याही स्थितीत त्याने वासंतीच्या खात्यावर 50 हजार रुपये भरणा करायचे आहे असे सांगून आपण व ती रिक्षातून बँकेत जातो असे सांगून तो वासंतीला घेउन रिक्षातून गेला होता. मागाहून रामानाथ व सोनू हे दोघेही चालत बँकेत गेले असता, वासंती व महानंद त्यांना दिसले नाही. सर्वत्र शोध घेउनही वासंती न सापडल्याने मागाहून यासंबधी फोंडा पोलीस तक्रारही नोंदविली होती.महानंदने वासंतीला ओपा जलशायाजवळील एका निर्जनस्थळी नेले होते. तिथे दुप्पटटयाने तिचा गळा आवळला व तिच्याअंगावरील दागिने काढून घेउन नंतर मृतदेह ओपला जलाशयात फेकून दिला होता. सरकारी वकील सुभाष देसाई यांनी पणजी सत्र न्यायालयात हा खटला प्रभावीपणो मांडताना एकूण बारा साक्षीदार तपासले होते. सत्र न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा फर्माविली होती. मागाहून महानंदने या शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. तेथे हे आव्हान फेटाळून लावल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात त्यांनी या शिक्षेविरुध्द अपील केले होते.
सिरियल कीलर महानंदला जन्मठेपेच; सर्वोच्च न्यायालयाकडून शिक्षा कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 6:52 PM
महानंदाने तिच्यावर लैंगिक अत्याचार करुन तिचे दागिने लुटून तिची निर्घृण हत्या केली होती.
ठळक मुद्देतरवळे - शिरोडा येथील महानंद नाईक याला फोंडा पोलिसांनी अटक केली होती. सत्र न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा फर्माविली होती. मागाहून महानंदने या शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.