मुंबई - वरळीत निर्माणाधीन इमारतीचे बांधकाम सुरू असताना एका इमारतीत लिफ्ट कोसळून सहा जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी ना.म.जोशी मार्ग पोलिसांनी सुपरवायझर आणि कंत्राटदार या दोघांना अटक केली. मृत मजूरांच्या सुरक्षेसाठी योग्य त्या उपाययोजना व साहित्य, साधनसामुग्री पुरवण्यात आले नसल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. सुपरवायझर स्वप्नील अशोक म्हामुणकर आणि कंत्राटदार मुकेशभाई पारसीया अशी या दोन आरोपींची नावे असून त्यांना कोर्टाने २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली असल्याची माहिती ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप भोसले यांनी लोकमतशी बोलताना माहिती दिली.
बी.डी.डी.चाळ नं.119 च्या समोर, शंकरराव नरम पथ येथे ललीत अंबीका बिल्डरच्या श्री. लक्ष्मी को.ऑ.हौ.सो. या इमारतीच्या कार पार्कीगच्या बांधकाम सुरू होते. त्यावेळी झालेल्या लिफ्ट दुर्घटनेत 1) अनिलकुमार नंदलाल यादव 2) चिन्मय आनंद मंडल, वय 30 वर्षे, 3) भरत आनंद मंडल, वय 30 वर्षे 4) अभय मिश्री यादव, वय 32 वर्षे 5) अविनाश जगन्नाथ दास या पाच मजूरांचा मृत्यू झाला. तर लक्ष्मण गुरूपाध्ये मंडल हा मजूर गंभीर जखमी होता असून उपचारादरम्यान केईएम रुग्णालयात मृत्यू झाला.
प्राथमिक तपासात या बांधकामाच्या साईटवरील सुपरवायझर स्वप्नील अशोक म्हामुणकर आणि कंत्राटदार मुकेशभाई पारसीया यांनी तेथील मजुरांना सेफ्टी बेल्ट, हेल्मेट इ. व्यक्तीगत सुरक्षीततेकरीता लागणारे साहित्य उपलब्ध न करता काम करण्यास भाग पाडले. त्यांच्या या निष्काळजीपणामुळे या सहा मजूरांचा मृत्यू झाला असा आरोप ठेवत त्यांच्याविरोधात भादंवि कमल 304(2) अंतर्गत गुन्हा दाखल करून ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी त्यांना अटक केली. शनिवारी सायंकाळी पावणे सहा वाजता वरळी येथील बीडीडी चाळ क्रमांक ११८ आणि ११९ च्या विरुद्ध बाजूस असलेल्या शंकरराव पदपथ मार्गावरील अंबिका बिल्डर्स येथे बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी लिफ्ट कोसळली. या दुर्घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाचे जवान, पोलीस दाखल झाले होते.