नवी मुंबई : कोरोना रुग्णांवर उपचारासाठी वापरलेले जुने हातमोजे विक्रीप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी अद्यापपर्यंत पाच जणांना अटक केली आहे. त्यांनी ज्या कंपनीला या हातमोजांची विक्री केली होती, त्या कंपनीने देशभरात १०७ ठिकाणी मोजे पुरवले आहेत. या प्रकरणात पाच राज्यांत झडती घेण्यात आली असून, ४८ टन जुने हातमोजे जप्त करण्यात आले आहेत. त्याची किंमत सुमारे ५० लाख आहे. या रॅकेटचा मुख्य सूत्रधार मात्र अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही.या टोळीने विक्रोळीच्या नेल्सन इंडिया कंपनीला हे हातमोजे पुरवले असता, त्यांनी ते देशभरातील १०७ कोविड सेंटरमध्ये पुरविले होते, तर आणखी ठिकाणी पुरवले जाणार होते. मात्र, गुन्हे शाखा पोलिसांनी हे रॅकेट उघडकीस आणल्यानंतर सदर हातमोजे परत मागविण्यात आले आहेत.महापे येथे जुने हातमोजे धुऊन नवीन बॉक्समध्ये भरले जात असल्याची माहिती गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, युनिट एकच्या पथकाने त्या ठिकाणी छापा टाकून प्रशांत सुर्वे याला अटक केली होती. त्याच्याकडून ४ टन जुने हातमोजे जप्त करण्यात आले होते, तर अधिक चौकशीत त्याच्याकडून समोर आलेल्या माहितीच्या आधारे विपुल शहा, शेख अफरोज शेख इनायत व इमरान लतीफ सिद्दीकी यांना अटक करण्यात आली होती. अधिक चौकशीत हे सर्वजण केवळ मध्यस्थी व्यक्तीच्या संपर्कात असल्याचे समोर आले होते. त्यानुसार, मुख्य सूत्रधाराच्या संपर्कात असलेला मुख्य मध्यस्थी तरुण रामाणी याला दिल्लीमधून अटक करण्यात आली आहे. त्याच्या अधिक चौकशीत के. किशोर याची माहिती समोर आली असून, नवी मुंबई पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
देशभरात १०७ ठिकाणी जुन्या हातमोजांचा पुरवठा, पाच जणांना अटक; ४८ टन साठा जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2020 5:10 AM