मुंबई : धार्मिक भावना दुखावल्या आणि पाकिस्तानी मौलवी झोनचे समर्थन केल्याप्रकरणी सर जे. जे. मार्ग पोलीस ठाण्यात चार राज्यांतील माैलवींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सर जे. जे. मार्ग पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे.
मौलाना अख्तर अब्बास जोन (लखनऊ), मौलाना तकवीर रजा अबिदी (हैदराबाद), मौलाना गुलाम मोहम्मद मेहंदी (चेन्नई) आणि मौलाना गुलाम हसन मट्टू (श्रीनगर) अशी या गुन्हा दाखल झालेल्या माैलवींची नावे आहेत. सर जे. जे. मार्ग पोलिसांनी, येथील हजरत अब्बा स्ट्रीट परिसरात राहण्यास असलेल्या इरफान अली सय्यद यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.
सय्यद यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सिया उलेमा असेम्ब्ली, इंडिया आणि मज्जिद ए इराणीया मोगल मशीदचे विश्वस्त यांनी १८ ऑक्टोबर रोजी कमी मसले हाल और हिकमत आमिल अशा कार्यक्रमांचे आयोजन केले होते. मौलाना अख्तर अब्बास जॉन यांनी सप्टेंबर महिन्यातही धार्मिक भावना दुखावतील, असे वक्तव्य केले. तसेच पाकिस्तानी मौलवी झोनचे समर्थन केले होते.
माैलाना तकवीर अबिदी, मोलाना गुलाम मोहम्मद मेहंदी आणि मौलाना गुलाम हसन मट्टू हे तिघेही इस्लामधर्मीयांच्या भावना दुखावतील असे कृत्य वारंवार करतात आणि भारतविरोधी वक्तव्य करून विभिन्न धार्मिक गटांमध्ये तेढ निर्माण करून समाजामध्ये अशांतता पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप सय्यद यांनी केला आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून, अधिक तपास करत आहेत.