नवी दिल्ली : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी नव्याने केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी होणार आहे. परमबीर सिंह यांनी त्यांच्या सुरू असलेल्या सगळ्या चौकशा महाराष्ट्राबाहेर सीबीआयसारख्या स्वतंत्र संस्थेकडे पाठवाव्यात, अशी मागणी याचिकेत केली आहे. राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंह यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केल्यानंतर त्यांना पोलीस आयुक्तपदावरून दूर करून राज्याच्या होमगार्डचे जनरल कमांडर बनवले गेले होते. सिंह यांनी देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची सीबीआयकडून चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. सिंह यांच्या आरोपानंतर देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला.
सर्वोच्च न्यायालयात केलेल्या आपल्या ताज्या याचिकेत सिंह यांनी राज्य सरकार आणि त्याच्या यंत्रणांकडून माझ्या अनेक चौकशा केल्या जात आहेत, असा आरोप केला आहे. या चौकशा महाराष्ट्राबाहेर हलवण्यात याव्यात आणि त्यांची चौकशी सीबीआयसारख्या स्वतंत्र यंत्रणेकडून केली जावी, अशी मागणी त्यांनी याचिकेत केली आहे. सुटीतील न्यायमूर्ती विनीत सरन आणि बी.आर. गवई यांच्या खंडपीठासमोर याचिकेवर सुनावणी होईल, असे परमबीर सिंह यांचे वकील मुकुल रोहटगी यांनी सांगितले. परमबीर सिंह यांनी या याचिकेत राज्य सरकार, सीबीआय आणि महाराष्ट्राचे पोलीसप्रमुख यांना प्रतिवादी केले आहे.