अहमदनगर - सहा वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या सैराट चित्रपटाने रेकॉर्डब्रेक यश मिळवलं होतं. तसेच या चित्रपटातील आर्ची आणि परशासोबत प्रत्येक पात्र चित्रपट प्रेमींच्या मनात घर करून राहिलं आहे. दरम्यान, सैराटमध्ये आर्चीच्या भावाची भूमिका करणाऱ्या सूरज पवारने त्याच्या निगेटिव्ह भूमिकेमध्ये छाप पाडली होती. दरम्यान, फसवणुकीच्या एका प्रकरणामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यामध्ये सूरज पवार याचाही समावेश असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
या प्रकरणात संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, तीन जणांना अटक करण्यात आली आहे. दत्तात्रय क्षीरसागर, ओमकार तरटे आणि आकाश शिंदे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत. तसेच या प्रकरणामध्ये सूरज पवार याचेही नाव समोर आले आहे.
मंत्रालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवू पाच लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोप या सर्वांवर असून, या प्रकरणात महेश वाघडकर यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करत पोलिसांनी तीन जणांना अटक लेली आहे. तसेच त्यांच्याकडे केलेल्या चौकशीमधून सूरज चव्हाणचं नाव समोर आलं आहे. आता सूरज पवार यालाही अटक करण्यात येणार असल्याचे संकेत पोलिसांकडून दिले जात आहेत.