नवी दिल्ली - ६ महिन्यांपूर्वी एका 16 वर्षीय मुलीची हत्या झाली असा अंदाज वर्तवणाऱ्या दिल्लीपोलिसांना जणू आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण ही मुलगी घरी परतली आहे. झारखंडच्या रांची येथील ही मुलगी असून सोमवारी ती आपल्या घरी पोहोचली. आपल्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती तिने दिली आहे.
याबाबत आम्ही मुलीची भेट घेतली असून तिने गेल्या ६ महिन्यांमध्ये आपल्यासोबत काय काय घडले याची माहिती दिली असल्याचे रांचीच्या लापुंग पोलीस स्थानकाचे प्रमुख विकास कुमार यांनी सांगितले. एका मानव तस्कराने मुलीचे अपहरण करुन तिला चंदीगड येथे घेऊन गेला होता. या ठिकाणी त्याने मुलीला घरकामाला जुंपले होते, यानंतर ती नोएडा येथे काम करत होती अशी हकीकत पुढे आली आहे.
मे महिन्यात दिल्लीतील मुंडका भागात निहाल विहार येथे एका मुलीचे तुकडे तुकडे केलेला मृतदेह आढळून आला होता. याचवेळी झारखंड येथील एक मुलगी गायब झाल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. यानंतर पोलिसांनी मुलीच्या भावाला मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी दिल्लीला आणले असता त्याने ही आपली बहिण असल्याचे सांगितले होते. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटकही करून या हत्याकांडाचा तपास पूर्ण केला होता. पोलिसांनी प्लेसमेंट एजन्सीचा मालक आणि त्याच्या दोन सहकाऱ्यांना अटक केली. मनजीत करकेटा, गौरी आणि साहू असे अटक केलेल्यांची नावे आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आता 6 महिन्यांपूर्वी हत्या झाली अशी शक्यता वर्तवण्यात आलेली मुलगी घरी परतल्याने पोलिसांपुढे यक्ष प्रश्न उभा राहिला की, मग मे महिन्यात दिल्लीत सापडलेला मुलीचा मृतदेह नक्की कोणाचा?. या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्यात येणार असून तिन्ही आरोपींना कोठडीत घेऊन तपास करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले आहे.