उत्तर प्रदेशच्या मथुरापोलिस ठाण्याअंतर्गत एक वेगळीच अन् आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे ही बाब न्यायालयासमोर मांडण्यात आल्यानंतर न्यायाधीशांनीही आश्चर्य व्यक्त करत पोलिसांना पुरावे द्या, असे सुनावले. येथील एका प्रकरणात चक्क उदरांना ५०० किलो गांजा खाल्ल्याचे पोलिसांनी न्यायालयात सुनावणीदरम्यान सांगितले. त्यामुळे हा आश्चर्यकारक घटना सध्या चर्चेचा विषय बनली आहे.
पोलिसांनी कोर्टात दिलेल्या अहवालात म्हटले की, पोलिसांनी जप्त केलेला आणि गोदामात ठेवलेला ५८१ किलो गांजा उंदरांनी खाल्ला आहे. या गांजाची किंमत अंदाजे ६० लाख रुपये एवढी होती. पोलिसांनी दोन वेगवेगळ्या प्रकरणात एनडीपीएस एक्टअंतर्गत कारवाई करुन हा गांजा जप्त केला होता. शेरगढ आणि हायवे परिसरातून हा गांजा जप्त करण्यात आला होता. पोलिसांनी एडीजे सप्तम यांच्या कोर्टासमोर यासंबंधीत अहवाल सादर केला. त्यानंतर, न्यायाधींनीही आश्चर्य व्यक्त करत याप्रकरणी २६ नोव्हेंबरपर्यंत पुरावे सादर करण्याचे आदेशच पोलिसांना दिले आहेत. तसेच, एसएसपी यांना उंदरांचा बंदोबस्त करण्याचेही बजावले आहे.
पोलिसांनी २०१८ साली हा गांजा जप्त केला होता, त्यानंतर गोदामात ठेवण्यात आला. त्यावेळी, पुरावा म्हणून तो गांजा दाखवण्यातही आला होता. मात्र, आता उंदरांनी तो गांजा खाल्ल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तसेच, थोडा गांजा उरला होता, तो नष्ट करण्यात आल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. त्यामुळे, पुरावे देण्यास पोलीस असमर्थ ठरल्याचं दिसून येत.