नवी दिल्ली : गोण्या किंवा गोणपाट जर रिकामे असेल तर त्यात काहीच असू शकत नाही. मग त्यातून हेरॉईन हा अंमली पदार्थ कसा कार नेता येईल, असा प्रश्न पडला असेल ना? खरे आहे. अशा प्रकारे तब्बल 5 हजार कोटींहून जास्तीचे हेरॉईन परदेशातून भारतात आणण्यात आले आहे. हा तस्करीचा प्रकार पाहून दिल्लीचे पोलिसही चक्रावले आहेत.
दिल्लीच्य़ा विशेष पोलिसांच्या टीमने हेरॉइनची बेकायदेशीर फॅक्टरी शुक्रवारी उघड केली. या फॅक्टरीचे संबंध थेट तालिबानशी जोडले गेल्याचे आढळले आहे. यावेळी जवळपास 600 कोटींचे हेरॉईन जप्त करण्यात आले. ही टोळी रिकाम्या गोण्यांतून हा अमली पदार्थ अफगानिस्तानहून दिल्लीला आणला जात होता.
रिकाम्या गोणीची किंमत चार कोटी?अफगाणिस्तानमधून आयात केल्या जाणाऱ्या या गोणीची किंमत तब्बल चार कोटी रुपये होती. या गोणीतून आणल्या जाणाऱ्या एक किलो हेरॉईनची ती किंमत होती. तागाच्या या गोण्या पातळ हेरॉईनमध्ये बुडविल्या जात होत्या. नंतर त्या सुकवून दिल्लीला पाठविण्यात येत होत्या. या गोण्या रिकाम्याच घडी केलेल्या असायच्या. हा प्रकार त्यामुळे कोणाच्या लक्षातही आला नाही. या गोण्या दिल्लीतील फॅक्टरीमध्ये आणल्यानंतर त्या काही रसायनांमध्ये बुडवून विशिष्ट पद्धतीने हे हेरॉईन पावडर स्वरूपात काढले जात होते. यानंतर या गोण्या जाळल्या जात होत्या. एका गोणीतून कमीतकमी किलोभर हेरॉईन निघत होते. या हेरॉईनची किंमत 4 कोटी होती. हा तस्करीचा प्रकार नवा असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दिल्ली पोलिसांनी फॅक्टरीवर छापा मारल्यानंतर हा प्रकार उघड झाला. लाजपत नगर भागात हा छापा मारण्यात आला. या ठिकाणाहून पोलिसांनी 600 कोटींची 150 किलो हेरॉईन जप्त केली. तसेच पाच लक्झरी कार, दोन पिस्तूल, आणि 20 काडतुसेही जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणी शिनवारी रहमत गुल (30) आणि अख्तर मोहम्मद शिनवारी (31) या अफगाणच्या नागरिकांना अटक करण्यात आली आहे.