लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भूमापन कार्यालयातील महिला अधिकाऱ्याला गुन्ह्यात अडकविण्याचा धाक दाखवून अडीच लाखांची लाच मागणारा एसीबीचा आरोपी पोलीस निरीक्षक पंकज शिवरामजी उकंडे याने अखेर गुरुवारी एसीबीच्या अधिकाऱ्याकडे शरणागती पत्करली.मुंबई मुख्यालयातून कारवाईचे आदेश मिळाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) वरिष्ठांनी उकंडे याच्याविरुद्ध मंगळवारी २४ डिसेंबरला गुन्हा दाखल केला होता. या घडामोडीनंतर उकंडे फरार झाला होता.भूमापन कार्यालयातील आश्रय मधुकर जोशी (वय ४०) नामक आरोपीला एक लाखाची लाच मागण्याच्या आरोपावरून एसीबीने १५ नोव्हेंबरला अटक केली होती. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक पंकज उकंडे याच्याकडे होता. तपास करण्याच्या नावाखाली उकंडेने जोशीच्या कार्यालयातील महिला अधिकारी (तक्रारदार) यांच्याकडे जाऊन विचारपूस केली आणि त्यांच्याकडून रक्कम उकळण्यासाठी डाव टाकला. या गुन्ह्यात जोशीसोबत तुमचा सहभाग असल्याचे सांगून तुम्हालाही सहआरोपी करणार आहोत, असा धाक त्याने महिला अधिकाºयाला दाखवला. जर तुम्हाला गुन्ह्यात आरोपी व्हायचे नसेल तर त्यासाठी दोन लाखांची लाच द्यावी लागेल, असे उकंडे म्हणाला. दुसरे म्हणजे, जोशी याचा पीसीआर वाढविला तर तो तुमचे नाव घेईल आणि नंतर प्रकरण हाताबाहेर जाईल. त्यामुळे त्याचा पीसीआर न वाढवण्यासाठी ५० हजारांची वेगळी लाच द्यावी लागेल, असेही त्याने महिला अधिकाऱ्याला धमकावले. जोशीच्या गुन्ह्यातकसलाही संबंध नसताना उगाच धाक दाखवून अडीच लाख रुपयांची लाच उकळण्याचा प्रयत्न उकंडे करीत असल्याने महिला अधिकाऱ्याने आपल्या एका निकटस्थताच्या मदतीने एसीबीच्या वरिष्ठांची भेट घेतली आणि त्यांच्याकडे १६ नोव्हेंबरला उकंडेची तक्रार नोंदवली. तक्रारीची शहानिशा केल्यानंतर उकंडेविरुद्ध कारवाईच्या मंजुरीसाठी स्थानिक वरिष्ठांकडून एसीबीच्या मुंबई मुख्यालयात प्रकरण पाठविण्यात आले. तेथून कारवाईची परवानगी मिळताच ३१ डिसेंबरला एसीबीने सदर पोलीस ठाण्यात आरोपी पोलीस निरीक्षक उकंडे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. कारवाईची कुणकुण लागताच उकंडे फरार झाला. त्याने अटकपूर्व जामीन मिळवण्याचाही प्रयत्न केला. मात्र, त्यात त्याला यश आले नाही. त्यामुळे गुरुवारी २ जानेवारीला त्याने एसीबीच्या कार्यालयात येऊन आत्मसमर्पण केले. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्याला अटक केली.
नागपुरातील लाचखोर पोलीस निरीक्षकाची शरणागती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2020 12:04 AM
भूमापन कार्यालयातील महिला अधिकाऱ्याला गुन्ह्यात अडकविण्याचा धाक दाखवून अडीच लाखांची लाच मागणारा एसीबीचा आरोपी पोलीस निरीक्षक पंकज शिवरामजी उकंडे याने अखेर गुरुवारी एसीबीच्या अधिकाऱ्याकडे शरणागती पत्करली.
ठळक मुद्देएसीबीने केली अटक : शुक्रवारी न्यायालयात नेणार