लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : नक्षल्यांच्या टेक्निकल टीममध्ये कार्यरत असलेल्या ६३ वर्षीय नक्षलीसह एका ३४ वर्षीय महिला नक्षलीने बुधवारी गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. हे दोघेही वेगवेगळ्या दलममध्ये एरिया कमिटी मेंबर पदावर कार्यरत होते. त्यांच्यावर प्रत्येकी ६ लाखांचे इनाम होते. रामसिंग ऊर्फ सीताराम बक्का आत्राम आणि माधुरी ऊर्फ भुरी ऊर्फ सुमन राजू मट्टामी अशी त्यांची नावे आहेत. पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक (अहेरी) अनुज तारे यांनी पांढरा दुपट्टा व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. या दोघांनाही पुनर्वसनाकरिता प्रत्येकी ४.५ लाख रुपये रोख, घरकुल आणि रोजगारासाठी मदत केली जाणार आहे.
गंभीर गुन्ह्यात होता सहभाग रामसिंग हा मूळचा अहेरी तालुक्यातील अर्कापल्ली येथील रहिवासी आहे. मार्च २००५ ला तो अहेरी दलममध्ये भरती झाला होता. त्यानंतर पेरमिली दलम आणि २०१२ ते मार्च २०२२ पर्यंत भामरागड एरिया टेक्निकल दलममध्ये एसीएम पदावर कार्यरत होता. त्याच्यावर एक खून, एक चकमक व इतर १, असे
३ गुन्हे आहेत. माधुरी ऊर्फ भुरी ही एटापल्ली तालुक्यातील गट्टेपल्ली येथील मूळची रहिवासी आहे. नोव्हेंबर २००२ ला ती कसनसूर दलममध्ये भरती झाली. त्यानंतर भामरागड दलम आणि फेब्रुवारी २०१३ ते एप्रिल २०२२ पर्यंत पेरमिली दलममध्ये एसीएम पदावर कार्यरत होती. तिच्यावर खुनाचे ४ गुन्हे, चकमकीचे २१, जाळपोळीचे ७ आणि इतर ५, असे एकूण ३७ गुन्हे दाखल आहेत.
... म्हणून आत्मसमर्पणाकडे वाढला कल शासनाची आत्मसमर्पण योजना, वर्षभरात विविध चकमकीत झालेला नक्षलींचा खात्मा, तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून अनेक जहाल माओवादी आत्मसमर्पणाच्या वाटेवर आले आहेत. - अंकित गोयल, पोलीस अधीक्षक