गडचिरोली : नक्षल चळवळीतील हिंसाचार आणि अस्थिर जीवनाला कंटाळून एका महिला नक्षलवाद्याने केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) अधिकाऱ्यांकडे आत्मसमर्पण केले. करिष्मा उर्फ गंगा उर्फ सविता अजय नरोठी (२० वर्ष) असे तिचे नाव असून ती मूळची छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यातील पुसगुट्टा या गावातील रहिवासी आहे. सीआरपीएफचे पोलीस उपमहानिरीक्षक मानस रंजन यांनी तिचे पुष्पगुच्छ आणि पांढरा दुपट्टा देऊन स्वागत केले. त्यानंतर तिचे हस्तांतरण गडचिरोली पोलीस दलाकडे करण्यात आले. यावेळी गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, एएसपी मनिष कलवानिया, समीर शेख, सोमय मुंढे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. करिष्मा ही गडचिरोली जिल्ह्यातील चातगाव दलममध्ये कार्यरत होती. तिच्यावर ४ गुन्हे दाखल असून शासनाने २ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.
जिल्ह्यात पोलीस दलाच्या वतीने नक्षलविरोधी अभियानासोबतच आदिवासी बांधवांसाठी जनजागरण मेळावे, ग्रामभेटी, नक्षल सदस्यांच्या कुटुंबीयांचे मेळावे, सहली असे विविध उपक्रम राबविले जात असल्यामुळे पोलिसांबद्दल नागरिकांमध्ये विश्वास वाढत आहे. त्यातूनच आत्मसमर्पणाला प्रतिसादही वाढत आहे.
अवघ्या १३ व्या वर्षी दलममध्ये
आत्मसमर्पित नक्षली करिष्मा ही सात वर्षांपूर्वी म्हणजे २०१४ मध्ये नक्षल दलममध्ये भरती झाली होती. त्यावेळी ती अवघ्या १३ वर्षांची होती, अशी माहिती डीआयजी मानस रंजन यांनी दिली. यावरून नागरिकांच्या असहायतेचा फायदा घेत मुले सज्ञान होण्याआधीच त्यांना दलममध्ये भरती केले जात असल्याचे दिसून येते. सध्या गडचिरोली जिल्ह्यातून नक्षल दलममध्ये भरती होण्यास कोणी तयार होत नसल्यामुळे छत्तीसगडकडील दलम सदस्यांना नक्षली कारवायांसाठी गडचिरोली जिल्ह्यात पाठविले जात आहे.